शहरातील कचराकुंड्या ‘ओव्हरफ्लो’; निष्काळजी आरोग्य अधिका-याचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

- विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आरोप
- आरोग्य कार्यकारी अधिका-याला निविदेत रस
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील गल्लोगल्ली ठेवलेल्या कचराकुंड्या ओव्हरफ्लो होवू लागल्या आहेत. तोच कचरा रस्त्यावर पडून अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे. त्याकडे महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. मात्र, त्यांना नागरिकांच्या आरोग्यापेक्षा विविध कामांच्या निविदा काढण्यात अधिक रस दिसत आहे. त्यामुळे निष्काळी आरोग्य कार्यकारी अधिका-यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून स्वच्छ व सुंदर शहराची वाट लागली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला.
याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, शहरातील घरोघरचा कचरा एकत्र करुन तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेणे. या कामासाठी नियमित ठेकेदाराची नियुक्ती होवून अद्याप काम सुरु झालेले नाही. जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढ देऊन त्यांच्याकडून कचरा संकलनाचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेत आजही दोन वर्षापुर्वीचीच जैसे थे परस्थिती दिसत आहे.
शहरात ठिकठिकाणी कच-याचे ढीग दृष्टीस पडतात. ज्या ठिकाणी कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत, त्या कच-याने भरुन वाहत आहेत. तसेच शहरातील मोकळ्या जागेत सुध्दा मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. तो वेळोवेळी उचला जात नाही. त्यामुळे परीसरामध्ये दुर्गंधी सुटून रोगराई होवू लागली आहे. शहरातील पवना नदीच्या पुलावर निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कुंड ठेवलेले आहेत. ते सुध्दा भरुन वाहत आहे. एकुणच शहरात कच-याची स्थिती गंभीर बनली आहे.
तसेच लवकरच पावसाळा सुर होणार आहे. परंतु अद्याप शहरातील नाले सफाईबाबत प्रशासनाने कोणतीही हालचाल केलेली नाही. शहरातील ओढे, नाले याची वेळेवर साफसफाई होत नाहीत. तर पावसाचे पाणी या नाल्यांमध्ये तुंबून शेजारील लोकवस्ती घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वित्त व जिवित हानी होवू शकते. त्यामुळे शहरातील सर्व ओढे, नाले व गटर्स यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे.
दरम्यान,शहरातील घरोघरीचा कचरा एकत्रित करुन तो मोशी येथील कचरा डेपोवर नियमितपणे हलविण्यात यावा. तसेच शहरात कचरा साठून राहणार नाही. तसेच शहरातील ओढे ,नाले व गटर्स याची पावसाळा सुरु होण्यापूर्वी साफ सफाई करण्यात यावी. जेणे करुन पावसाचे पाणी तुंबून नागरीकांची गैरसोय होणार नाही. यावर तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी साने यांनी केली.