शरद पवार व सुप्रिया सुळे कधी व कुठे खोटे बोलले ?

- सुप्रिया सुळे : शाळा बंदचा निर्णयाचा घेतला समाचार
पुणे – शाळा बंद धोरणाबाबत शरद पवार व सुप्रिया सुळे हे धादांत खोटे बोलत आहे, या विनोद तावडे यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देत मी कधी व कुठे खोटे बोलले हे त्यांनी दाखवून द्यावे असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी तावडेंच्या शाळा बंद धोरणाचा समाचार घेतला. राज्यात कशा चुकीच्या पध्दतीने शाळा बंद करण्यात आल्या याची आकडेवारीही त्यांनी सादर केली.
सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबची माहिती दिली. यावेळी शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण विभागातील माजी संचालक वसंत काळपांडे व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आदी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, राज्यात तेराशे शाळा समायोजित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. सर्व स्तरातून ओरड झाल्यानंतर त्यातून काही शाळा वगळण्यात आल्या. मात्र माझ्याकडे आजही अशा शाळांची आकडेवारी आहे, कि जी शिक्षण हक्क कायद्याचा भंग करते आहे. शिक्षण हक्क कायदा सांगतो की विद्यार्थ्यांच्या घरापासून त्याच्या शाळेचे अंतर हे तीन किलोमीटरपर्यंत असावे. मात्र यांनी भलताच नियम लावून एक शाळा ते दुसरी शाळा असे अंतर मोजले आहे. शिरुर येथील भीलवस्तीतील शिंदोणी येथे एका शाळेची पटसंख्या 13 आहे. ती शाळा बंद करून दुसऱ्या शाळेत समायोजन झाले ते अंतर शाळेपासून 2.9 किमी आहे. अशा प्रकारची अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत असेही त्या म्हणाल्या. शिक्षणाचा कायदा कुठे पाळला जातो आहे असा असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
काळपांडे म्हणाले, शिक्षण विभागाने जे निर्णय घेतले ते जनतेला विश्वासात घेऊन त्यांचे पूर्ण स्पष्टीकरण देऊन घेणे गरजेचे होते. शाळा बंदबाबत आधी 1300 नंतर 567 असा आकडा सांगण्यात आला. मात्र, याचा खरा आकडा अद्याप समोर आलेला नाही. तसेच शिक्षणाची प्रगती 16 वरून 3 वर आली हे सांगतानाही अहवाल सादर करायला हवा होता. मात्र तसे काहीच झालेले दिसत नाही.
आजवरच्या राजकारणात कधीच खोटे बोलले नाही
आजवर राजकारणात आल्यापासून मी किंवा पवार साहेब कधीही खोटे बोललो नाहीत. मात्र, तावडे यांना असे वाटत असेल तर त्यांनी ते सिध्द करावे. शिक्षणमंत्री हे शाळा बंद धोरणाची पाठराखण करून बहुजन समाजाचे शिक्षण हिरावून घेत आहेत, असाही आरोप सुळे यांनी केला.शिक्षणाबाबत उपस्थित केले प्रश्न
– शाळा बंद करण्याचा निर्णय हा कोणते निकष लावून घेण्यात आला व त्याबाबत कोणताच अहवाल अद्यापपर्यंत का प्रसिध्द केला नाही?
– शिक्षणात महाराष्ट्र 16 व्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आला आहे, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते. ते कोणत्या सर्वेक्षणाच्या व कोणत्या अहवालाच्या आधारे केले?
– शरद पवार आणि सुप्रिया सुळे कोणत्या मुद्यांवर खोटे बोलतात तेही त्यांनी सविस्तर माध्यमांसमोर येऊन स्पष्ट का नाही केले?तावडेंच्या बॉसला ट्युशनची गरज
शिक्षणमंत्री काही अभ्यास न करता शाळा बंद करत असतील तर त्यांना ट्युशनची गरज आहे. असा प्रश्न विचारल्यानंतर सुळे म्हणाल्या, शिक्षणमंत्र्यांनाही व त्यांच्या बॉसला (मुख्यमंत्री) या दोघांना ट्युशनची गरज आहे. त्यांनी वसंत काळपांडे सरांकडे ट्युशन लावावी.