breaking-newsराष्ट्रिय

शक्तिप्रदर्शनाच्या आधीच येडियुरप्पांची राजीनाम्याची घोषणा

  • बहुमत मिळवण्यास अपयश आल्याने सोडली सत्ता

  • कॉंग्रेस-जेडीएस आघाडीत जल्लोष

बंगळुरू – साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभेतील शक्तिप्रदर्शनाच्या दिवशी भाजपचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी प्रत्यक्ष विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच राजीनामा देण्याची घोषणा केली.

भाजपने फोडाफोडीचे कसोशिचे प्रयत्न करूनही त्यांना त्यात अपेक्षीत यश न आल्याने भाजपला अखेर बहुमतासमोर गुढगे टेकावे लागले. आजचा हा दिवस अनेक नाट्यपुर्ण घडामोडींनी गाजला. कर्नाटक विधानसभेच्या हंगामी सभापतीपदावर सर्वात ज्येष्ठ सदस्यांची निवड करण्याचा संकेत बाजूला ठेऊन भाजपने आपल्या सदस्याची हंगामी सभापतीपदी नियुक्ती करून कॉंग्रेसवर कुरघोडी केली होती. त्याला कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आक्षेप घेतला पण न्यायालयाने तो धुडकाऊन लावल्यानंतर सरकार स्थापनेची ही चुरस विलक्षण टप्प्यावर आली होती. बहुमतासाठी 111 आमदारांचे संख्याबळ अपेक्षित असताना 104 जागा मिळवणाऱ्या भाजपला अन्य सदस्यांची मदत मिळू शकली नाही त्यामुळे त्यांना सत्ता सोडावी लागली आहे.

आज तणावाच्या वातावरणात कर्नाटक विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात झाली. सुरूवातीला सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. त्यांनंतर थेट विश्‍वास दर्शक ठराव मांडून भाषणांना सुरूवात झाली. मुख्यमंत्री या नात्याने हा ठराव मांडून येडियुरप्पा यांनी 20 मिनीटांचे भावुक भाषण केले. भाषणाचा शेवट करताना त्यांनी नमूद केले की मी संघर्षाच्या वाटचालीतनंतरच येथपर्यंत पोहचलो आहे. मी जरी सत्ता गमावली तरी माझे काही फार मोठे नुकसान होणार नाहीं. मी आत्ता थेट राज्यपालांकडे जाऊन माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. त्यानंतर त्यांच्यासह सभागृहातील भाजपचे बहुतांशी सदस्य सभागृहातून बाहेर पडले. सभागृहाच्या कामकाजच्या शेवटी राष्ट्रगीत वाजवले जाते त्यासाठीही ते सभागृहात उपस्थित राहिले नाहीत. राष्ट्रगीताचा कार्यक्रम पार पडल्यानंतर उपस्थित कॉंग्रेस व जेडीएस सदस्यांनी कुमार स्वामी आणि अन्य ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांचे अभिनंदन केले.

सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या म्हणाले की कर्नाटकात लोकशाहीचा विजय झाला आहे. घटनाबाह्य पद्धतीने सत्ता प्राप्त करून घेण्याचा भाजपचा कट फसला आहे. दडपशाही, आणि अमिषे यांचा वापर करून कॉंग्रेस व जेडीएसचे सदस्य फोडण्याचे त्यांनी सारे प्रयत्न केले पण ते आमच्या आमदारांच्या एकजुटीने फसले आहेत असेही त्यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button