Mahaenews

व्हीआयपी बाकडय़ांसाठी पालिकेचा दामदुप्पट खर्च

Share On

मुंबई- कुलाबा परिसरामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १६ व्हीआयपी बाकडे बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्यासाठी तब्बल पाच लाख १० हजार ८०० रुपये खर्च करण्यात येणार आहेत. बाजारामध्ये आठ ते दहा हजार रुपयांमध्ये मिळणारा हा एक बाकडा तब्बल ३२ हजार रुपयांना खरेदी करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे ही बाकडे खरेदी वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.

कुलाबा परिसरातील प्रभाग क्रमांक २२५ मधील शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता सानप यांनी १६ एप्रिल रोजी पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाला पत्र पाठवून कुलाबा परिसरातील शिवमंदिर येथील दर्यानगर पटांगण आणि विजयदीप येथील पटांगणात प्रत्येकी आठ व्हीआयपी बाकडे बसविण्यात यावे अशी विनंती केली होती. या पत्राची दखल घेत पालिकेने व्हीआयपी बाकडे बसविण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले. या दोन्ही ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या बाकडय़ांसाठी दोन प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रस्तावामध्ये आठ बाकडय़ांसाठी अंदाजित खर्च २ लाख ५५ हजार ४०० रुपये दाखविण्यात आला आहे. पालिकेच्या अंदाजपत्रकानुसार या दोन्ही ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या १६ व्हीआयपी बाकडय़ांसाठी एकूण ५ लाख १० हजार ८०० रुपये खर्च येणार आहे. ‘ए’ विभाग कार्यालयातील लेखा अधिकाऱ्यांमार्फत या खर्चाचे लेखा परीक्षण करण्यात येईल, असे या संदर्भात तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात नमुद करण्यात आले आहे. हा प्रस्ताव ए, बी, ई प्रभाग समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. आता या प्रस्तावाला स्थायी समितीच्या मंजुरीची आवश्यकता आहे.

बाजारामध्ये व्हीआयपी बाकडे सुमारे आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. असे असतानाही पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाने मात्र दोन्ही प्रस्तावामध्ये मिळून १६ बाकडय़ांसाठी अंदाजित किंमत  ५ लाख १० हजार ४०० रुपये दाखविली आहे. या आकडेवारीवरुन पालिका एक बाकडा तब्बल ३१ हजार ९२५ रुपयांना खरेदी करणार आहे. हा दर बाजारभावाच्या तिप्पट आहे. त्यामुळे या विरोधात आवाज उठविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाने करदात्या मुंबईकरांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशांची लूट सुरू केली आहे. बाजारभावाच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट दराने वस्तू खरेदी करुन कंत्राटदारांच्या झोळ्या भरण्याचे काम पालिका प्रशासन आणि सत्ताधारी करीत आहेत. पहारेकऱ्यांनाही डोळे बंद करुन घेतले आहेत. त्यामुळे करदात्या मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय होत आहे. ही बाब कदापि सहन केली जाणार नाही. याविरोधात आवाज उठविण्यात येईल.

– रवी राजा, विरोधी पक्षनेता

Exit mobile version