व्हिएतनाम आणि भारत यांच्यात नौदल अभ्यास सुरु

नवी दिल्ली : भारत-प्रशांत क्षेत्रातील देशांसोबत सैन्यसंबंध दृढ करण्याच्या धोरणांतर्गत भारत आजपासून व्हिएतनामसोबतचा नौदल अभ्यास सुरू करणार आहे. या नौदल अभ्यासाद्वारे भारताची नजर विस्तारवादी चीनवर देखील असेल. पुढील महिन्यात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन हनोईच्या दौऱयावर जाणार आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि उत्तर-पश्चिम भागात तैनात तीन भारतीय युद्धनौका, स्टेल्थ युद्धनौका आयएनएस सहय़ाद्री, क्षेपणास्त्र युद्धनौका आयएनएस कमोरता, आणि फ्लीट टँकर आयएनएस शक्ती सोमवारी व्हिएतनामच्या तियन सा बंदरात दाखल होतील.
21 ते 25 मे या कालावधीत दोन्ही देशांच्या नौदलाचे सदस्य परस्परांना भेटतील. तसेच व्हिएतनाम सरकारच्या प्रतिनिधींसोबत अधिकृत चर्चा होणार आहे. नौका दाखल झाल्यावर सागरी अभ्यासास प्रारंभ केला जाईल, अशी माहिती नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी.के. शर्मा यांनी दिली.
दोन्ही देशांच्या व्यापक सामरिक भागीदारीसाठी संरक्षण सहकार्य महत्त्वाचे मानत सीतारामन जून महिन्यात द्विपक्षीय सैन्य संबंधांना बळकटी देण्याच्या उद्देशाने व्हिएतनामचा दौरा करणार आहेत. याचबरोबर व्हिएतनाम सैन्याचे प्रमुख आणि तेथील नौदलाचे कमांडर चालू वर्षी भारताला भेट देतील.