वृक्ष लागवडीसाठी वर्षा मॅरेथॉन आयोजित करा

- नगरसेवक तुषार हिंगे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी – महापालिकेच्या वतीने वर्षा मॅरेथॉन आयोजित करून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी. त्यामध्ये सामाजिक संस्था, संघटनांना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी नगरसेवक तुषार हिंगे यांनी केली आहे.
यासंदर्भात हिंगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वृक्षलागवड आणि संवर्धनाच्या उपक्रमात शहरवासीयांना सहभागी होता येईल. विविध सामाजिक, राजकीय, संस्था आणि संघटना, शाळा, महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, पर्यावरणमित्र, रोटरी आणि लायन्स क्लब, विविध कंपन्या, आस्थापने, प्रवासी संघटना, डॉक्टर, वकील, सीए, उद्योजक, व्यावसायिक, कामगार आदी सर्व घटकांना या उपक्रमात सहभागी होता येईल. या माध्यमातून वृक्षलागवड आणि संवर्धनाबाबत समाजाला संदेश मिळेल, अशी सूचना हिंगे यांनी केली आहे.
वर्षा मॅरेथॉन ही नवीन संकल्पना आहे. आरोग्यदायी जीवनासाठी शहरात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्याच धर्तीवर ही संकल्पना आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यावर भर देता येईल. त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करता येईल. पावसाळ्यात हा उपक्रम व्यापक स्वरुपात राबविता येईल. म्हणून याला वर्षा मॅरेथॉन असे संबोधणे उचित राहिल. पावसाळा सुरू झालाच आहे. त्यामुळे आपण या बाबींचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी हिंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.