breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विश्व विक्रमाला पृथ्वीराजची गवसणी !

  • ‘जिनियस’ रेकॉर्डसाठी मानांकन जाहीर
  • पृथ्वीराजच्या गायनाची वर्ल्ड रेकॉर्डस्‌ इंडियामध्ये नोंद
पुणे (महा-ई-न्यूज) – बालगंधर्व रंगमंदीरात सोमवारी (दि. 29) 14 वर्षीय पृथ्वीराज सतीश इंगळे याने विश्व विक्रमाची नोंद करून सांस्कृतिक क्षेत्रात मानाचा तुरा खोवला. त्‍याने दुपारी 3 ते रात्री 8 या पाच तासांच्या कालावधीत शास्‍त्रीय, भावगीत आणि चित्रपट गीते सादर करून आपण वंडरबॉय असल्‍याचे दाखवून दिले. वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाच्या प्रतिनिधींनी पृथ्वीराजने जागतिक विक्रम केला असून त्‍याचे 2017-18 या वर्षासाठी ‘जिनियस’ रेकॉर्डसाठी मानांकन करत असल्‍याचेही जाहीर केले. ही घोषणा करताच उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण बालगंधर्व दुमदुमून गेले.
पृथ्वीराजच्या विश्व विक्रमाचा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राहुल जाधव, पं. उपेंद्र भट, भावगीत गायक श्रीकांत पारगावकर, वर्ल्ड रेकॉर्डस्‌ इंडियाचे प्रतिनिधी दिनेश पैठणकर, अनिरूध्द हळदे, संतोष राऊत, पृथ्वीराजच्या गुरु हिराताई दराडे, पृथ्वीराजचे वडील सतीश इंगळे, पृथ्वीराज थिएटरच्या संचालिका दयाताई इंगळे, मोहन कुलकर्णी, दत्ता थिटे, गफ्फार मोमीन, राजकुमार सुंठवाल आदी उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव म्‍हणाले, सतीश आणि दयाताई इंगळे या दाम्‍पत्‍याने पृथ्वीराज दिव्यांग असूनही खचून न जाता परिश्रम घेतले आणि त्‍याला घडवले. सिकंदराला सुध्दा जग जिंकता आले नाही. परंतु पृथ्वीराजने जग जिंकले. देवाने ज्‍यांना सर्व काही दिले ते घडू शकत नाही. पण काही उणीव असलेल्‍या व्यक्‍ती खूप काही शिकवून आणि विक्रम करून जातात. आई ही मुलाची पहिली गुरु असते. त्‍याप्रमाणे दयाताई या पृथ्वीच्या प्रथम गुरु आहेत. सतीश इंगळे यांची एकनिष्ठता, प्रामाणिकपणा यामुळेच आजचा जागतिक विक्रम शक्‍य झाला असे जाधव म्‍हणाले.
पं. उपेंद्र भट म्‍हणाले की, पृथ्वीचा संगीत व गायना विषयी असलेला ओढा, त्याची तयारी पाहून मी दि्‌गभ्रमीत झालो. त्‍याने शास्‍त्रीय संगीत ज्‍या ताकदीने सादर केले. त्‍याच पध्दतीने भावगीते आणि चित्रपट गीते सादर केली. हे सर्व आश्चर्याच्या पलिकडचे असून पृथ्वीची एकबाजू कमजोर असली तरी देवाने त्‍याला संगीतामध्ये वाटचाल करण्यासाठी भरपूर काही दिले आहे. त्‍याचा जन्मच संगीतामध्ये विक्रम करण्यासाठी झाला असून त्‍याचे पुढील भविष्य उज्ज्वल आहे. देवाने दिलेले आव्हान इंगळे पती-पत्नीने स्वीकारून कष्टाने पृथ्वीला सिध्द केले आहे. त्यांचे हे कष्ट पाहून देवानेसुध्दा हार मानली आहे, असे सांगत भट यांनी इंगळे कुटुंबियांचे कौतुक केले.
ज्‍येष्ठ भावगीत गायक श्रीकांत पारगावकर म्‍हणाले, पृथ्वीराजने आज बालगंधर्वमध्ये इतिहास घडवला आहे. कला-क्रीडा या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. क्रिकेट मध्ये ज्‍याप्रमाणे पृथ्वी शॉने लहान वयात विश्व विक्रम केला त्‍याप्रमाणे पृथ्वीराजने संगीतामध्ये जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. त्‍याची गाण्याची शैली, वैविध्य, नावीन्य पाहून मी प्रभावीत झालो. आज संगीत क्षेत्राचे अवलोकन केल्‍यास त्‍यामध्ये मोठ्याप्रमाणावर ‘पोल्‍युशन’ झाल्‍याचे दिसून येते. ते रोखण्यासाठी मी पृथ्वीकडे मोठ्या आशेने पाहत आहे. त्‍याचे गायनाचे दमदार सादरीकरण पाहून इतर कलावंतांना प्रोत्‍साहन मिळेल, असा विश्वास वाटतो. त्‍याने नियमीत रियाझ करून प्रगतीची घोडदौड सुरू ठेवावी, असा आशिर्वाद पारगावकर यांनी दिला.
तत्‍पूर्वी, पृथ्वीराजने तीन सत्रामध्ये शास्‍त्रीय संगीत, भावगीते, चित्रपट गीते सादर केली. कार्यक्रमाची सुरूवात राग सारंग ने करत पुढे अप्रतिम रीत्या राग मारूबिहाग सादर केला, यासाठी साथ संगत गुरू हिराताई दराडे यांनी केली. नंतर प्रथम तुला वंदितो, विठ्ठला तु वेडा कुंभार, देहाची तिजोरी, आकाशी झेप घेरे पाखरा, हनुमान चालीसा ही भक्ती गीते सादर झाली. शेवटच्या सत्रात आ चल के तुझे, फुलोंका तारोंका सबका कहेना है, मेरी प्यारी बहनीया, मै शायर तो नही, मेरी मॉं, जगजीत सिंह यांची गझल ‘होश वालो को खबर क्या’ तर पृथ्वीराज व सतीश इंगळे यांनी शोले चित्रपटातील ये दोस्ती हम नही तोडेंगे अशी सर्व प्रकारची सुरेल गाणी सादर केली.
पुण्यातील नामवंत गायक, संयोजक पृथ्वीराजला आशिर्वाद देण्यासाठी मकरंद पाटणकर, संदिप पंचवाटकर, जितेंद्र भुरूक, मनिषा निश्चल, प्रिती पेठकर, आरती आठल्ये, स्वाती शहा व अनेक कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संगीत संयोजन सईद खान यांनी केले. संयोजन मोहन कुलकर्णी, संगीतकार दत्ता थिटे, गायक गफार मोमीन, राजकुमार सुंठवाल यांनी केले. रंगमंच व्यवस्था राणे ब्रदर्स यांनी केली. स्वागत सतीश इंगळे यांनी तर सुत्रसंचालन स्नेहल दामले, आभार दया इंगळे यांनी मानले. यावेळी युनिटी ग्रुप, उडान फाऊंडेशनच्या वतीने पृथ्वीराजचा सत्‍कार करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button