breaking-newsक्रिडा

विश्वविक्रमी ३६५ धावांच्या सलामीमुळे विंडीजची आयर्लंडवर मात

वेस्ट इंडिजचे सलामीवीर जॉन कॅम्पबेल आणि शाय होप यांनी केलेल्या ३६५ धावांच्या तडाखेबंद सलामीच्या भागीदारीमुळे वेस्ट इंडिजने तिरंगी मालिकेतील एकदिवसीय सामन्यात आयर्लंडला तब्बल १९६ धावांनी धूळ चारली.

आयर्लंडने नाणेफेक जिंकून स्वीकारलेला गोलंदाजीचा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. कॅम्पबेल आणि होप यांनी सलामीला फलंदाजीला उतरत अनुक्रमे १७९ आणि १७० धावांची तुफानी खेळी केली. कॅम्पबेलने १३७ चेंडूंचा सामना करताना १५ चौकार आणि ६ षटकार लगावले, तर होपने १५२ चेंडूंचा सामना करीत २२ चौकार आणि दोन षटकार लगावत विश्वविक्रमी सलामी दिली.

या सलामीवीरांनी पाकिस्तानच्या इमाम उल हक आणि फखर झमान या जोडीचा झिम्बाब्वेतील ३०४ धावांच्या सलामीचा गतवर्षांतील विक्रम मोडीत काढला. तसेच ते एकदिवसीय क्रिकेटमधील कोणत्याही क्रमांकावरील सर्वात मोठय़ा भागीदारीच्या विश्वविक्रमाजवळ पोहोचले होते. मात्र, ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युअल्स यांनी दुसऱ्या गडय़ासाठी २०१५ सालच्या विश्वचषकात केलेल्या ३७२ धावांच्या भागीदारीच्या विक्रमापासून अवघे ७ धावा दूर राहिले. वेस्ट इंडिजच्या ५० षटकांमध्ये ३ बाद ३८१ धावांच्या प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ अवघ्या १८५ धावांमध्ये गारद झाला.

संक्षिप्त धावफलक

वेस्ट इंडिज : ५० षटकांत ३ बाद ३८१ (जॉन कॅम्पबेल १७९, शाय होप १७०; बॅरी मॅकार्थी २/७६) विजयी वि. आयर्लंड : ३४.४ षटकांत सर्वबाद १८५ (केव्हिन ओब्रायन ६८, गॅरी विल्सन ३०; अ‍ॅशले नर्स ४/५१).

 सामनावीर : जॉन कॅम्पबेल

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button