विरोधी पक्षांतील इतर नेताही पंतप्रधान म्हणून कॉंग्रेसला मान्य, पण…

- अट एकच: त्या उमेदवाराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा नसावा
नवी दिल्ली – भाजपला केंद्रात पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्षांतील कुठल्याही नेत्याला पंतप्रधान म्हणून स्वीकारण्याची तयारी असल्याचे संकेत कॉंग्रेसने दिले आहेत. अर्थात, पंतप्रधानपदाच्या त्या संभाव्य उमेदवाराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा नसावा, अशी कॉंग्रेसची अट आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच त्या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, विरोधी पक्षांतील इतर कुठल्याही नेत्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवण्यास कॉंग्रेसची ना नसेल, असे संकेत आज प्रथमच त्या पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील सुत्रांकडून देण्यात आले. भाजपला केंद्रातील सत्तेपासून रोखण्यासाठी विविध राज्यांत इतर पक्षांशी आघाडी करण्याला कॉंग्रेस प्राधान्य देणार असल्याचेही त्या सुत्रांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा त्या पदावर विराजमान होण्यासाठी 280 च्या घरात खासदारांचे पाठबळ आवश्यक असेल. पण, तशी स्थिती पुढील निवडणुकीनंतर नसेल. शिवसेना, तेलगूू देसम यांसारखे पक्ष भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ भाजप गाठू शकणार नाही. उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये योग्यरित्या भाजपविरोधी महाआघाड्या स्थापन झाल्यास सत्ता राखणे मोदींसाठी अशक्यप्राय बनेल, याकडे त्या सुत्रांनी लक्ष वेधले. उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये लोकसभेच्या अनुक्रमे 80 आणि 40 जागा आहेत. दोन्ही राज्यांत मिळून लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या 22 टक्के इतक्या जागा आहेत.
दरम्यान, पुढील लोकसभा निवडणुकीत महिला नेत्याला पंतप्रधापदाची उमेदवार बनवण्याची चर्चा विरोधकांच्या गोटात सुरू आहे. त्यादृष्टीने तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि बसपच्या प्रमुख मायावती यांच्या नावांवर विचार होत असल्याचे संकेत आहेत. त्यापार्श्वभूमीवर, कॉंग्रेसने इतर नेताही पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे मानले जात आहे.