breaking-newsराष्ट्रिय

विरोधकांना एकत्र आणण्याच्या हाकेला बळ

नवी दिल्ली- देशाच्या विविध भागांतील पोटनिवडणुकांत भाजपची पीछेहाट झाल्याने विरोधकांच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ताज्या निकालामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपशी दोन हात करण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याच्या हाकेला आणखीच बळ मिळाले आहे.

पोटनिवडणुकांचा निकाल म्हणजे मोदी सरकारच्या चार वर्षांच्या राजवटीविरोधात जनतेने दिलेला कौल आहे. हा निकाल म्हणजे भाजप राजवटीच्या शेवटाची सुरूवात आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसकडून देण्यात आली. उत्तरप्रदेशची कैराना लोकसभा जागा भाजपकडून खेचून घेणाऱ्या रालोदने हा विजय विरोधकांच्या ऐक्‍याचा असल्याचे म्हटले. एकवटलेले विरोधक भाजपच्या पराभवाचे हे सत्र पुढील लोकसभा निवडणुकीवेळीही कायम ठेवतील, असा विश्‍वासही त्या पक्षाने व्यक्त केला. तर मोदी सरकारबाबत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. प्रादेशिक पक्ष आता आणखी बळकट बनले आहेत, असे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

पोटनिवडणुकांमध्ये जनतेने भाजपला चपराक लगावली. शेतकरी, गरीब आणि दलितांचा विजय झाला आहे. लोकशाहीवर विश्‍वास नसणाऱ्यांचा आणि विभाजनाचे राजकारण करणाऱ्यांचा पराभव झाला आहे. उत्तरप्रदेशात सप, बसप, रालोद, आप अशा पक्षांनी एकत्र येऊन कार्य केले. उत्तरप्रदेशात विरोधकांना मिळालेल्या यशातून संपूर्ण देशाला संदेश दिला गेला आहे, अशी प्रतिक्रिया सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिली.

भाजपचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचा संकेत पोटनिवडणुकांच्या निकालाने दिला आहे. भाजपशी राजकीय संघर्ष करण्यासाठी विरोधकांच्या ऐक्‍याची संकल्पना राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी मांडली. ती संकल्पना आता देशभरात आकारास येत आहे, असे लालूपुत्र तेजस्वी यादव यांनी निकालांनंतर म्हटले. विरोधकांनी एकत्र येऊन पोटनिवडणुकांत मिळवलेला विजय म्हणजे धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी शक्तींचे यश आहे. या शक्तींना आता एकत्र येण्याची गरज पटली आहे, असे भाष्य भाकपचे नेते डी.राजा यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button