विरोधकांचे ऐक्य अल्पजीवी ठरेल – रामविलास पासवान

रांची – देशातील विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकीच्या निमीत्त विरोधी पक्ष एकत्र आले असले तरी त्यांच्यातील हे ऐक्य अल्पजीवी ठरेल आणि सन 2019 च्या निवडणुकीत मोदींच्याच नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की विरोधकांकडे सर्व मान्य नेतृत्व नाही ही त्यांची सर्वात कमकुवत बाजू आहे.
राहुल गांधी यांचे नेतृत्व विरोधी पक्षाचे नेते कितीपत स्वीकारतील या विषयी शंका आहे. तथापी एनडीएत मात्र नेतृत्वाचा प्रश्नच नाही. मोदींचे एकमुख भक्कम नेतृत्व एनडीएला लाभलेले असल्याने या आघाडीलाच सन 2019 च्या निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळेल असा दावाही त्यांनी केला आहे.
ते राजकारणात एकदोन जागांसाठी ऍडजसमेंट करणे अवघड नसते पण एखाद्या पक्षाशी संपुर्ण राज्यात किंवा देशात आघाडीचा समझोता करणे ही तशी सोपी बाब नाही. त्यामुळे विरोधकांच्या ऐक्याचा कितीही बागुलबुवा दाखवला जात असला तरी ही आघाडी जागा वाटपाच्यावेळी किती तग धरेल या विषयी शंका आहे.
उत्तरप्रदेशात मायावती यांनी 40 जागांचो आग्रह धरला आहे. मग समाजवादी पक्षाला किती जागा देणार आणि लोकदल व कॉंग्रेसच्या जागांचे काय करणार असा प्रश्न तेथे नक्की उपस्थित होणार आहे त्यामुळे त्यांच्यातील ऐक्य टिकण्याची शक्यता नाही असे पासवान म्हणाले.