विराट कोहलीने काढला दाढीचा इन्शुरन्स?

मुंबई: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कोहली त्याच्या फिटनेस आणि लूकला नेहमीच जपतो. कोहलीची दाढी तर तरुणाईत ट्रेंडमध्ये आहे. कोहलीच्या हँडसम लूकमध्ये त्याच्या दाढीचा मोठा वाटा आहे. हे सर्व असताना कोहलीनं त्याच्या दाढीचा विमा काढल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे. याबद्दलचा एक व्हिडीओ क्रिकेटपटू के. एल. राहुलने पोस्ट केला आहे.
विराट कोहली नेहमीच त्याच्या दाढीची काळजी घेताना दिसतो. त्यामुळेच त्यानं दाढीचा विमा काढल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात आहे. के. एल. राहुलनं ट्विटरवर एक सीसीटीव्ही फुटेज पोस्ट केल्यावर या चर्चेला सुरुवात झाली. यामध्ये विराट कोहली एका सोफ्यावर बसला असून दोघेजण त्याच्या दाढीचे फोटो काढताना दिसत आहेत. या दोघांपैकी एकानं कोहलीच्या दाढीचे केसदेखील एका पिशवीत जमा केले आहेत. ‘विराट, तू तुझ्या दाढीला खूप जपतोस हे आम्हाला माहित आहे. आता तू दाढीचा विमा काढल्यानं ते सिद्धही झालं आहे,’ असे राहुलने ट्वीटमध्ये म्हटले आहे.