breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विनायक मेटे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार

बीड: बीड लोकसभा मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांना धक्का बसला आहे. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंगअप्पा सोनवणे यांचा प्रचार करणार असल्याची घोषणा केली आहे. विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यात छुपा संघर्ष गेली अनेक काळ सुरू होता. मात्र, बीडमधील मेटे यांचे विरोधक व राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी प्रीतम मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर मेटे यांना निर्णायक भूमिका घेणे भाग पडले. अखेर त्यांनी राष्ट्रवादीने कोणताही पाठिंबा मागितला नसताना सोनवणे यांना विनाशर्त पाठिंबा दिला आहे.

बीड शहरातील विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर आणि विनायक मेटे यांच्यात लढत होते. २०१४ साली क्षीरसागर यांनी मेटेविरोधात अवघ्या ५ हजारांनी निसटता विजय मिळवला. त्यानंतर भाजपने मेटेंना विधानपरिषदेवर आमदारकी दिली तसेच शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद दिले. मात्र, स्थानिक राजकारणात पंकजा मुंडे यांनी मेटेंना कायमच दूर ठेवले होते. त्यामुळे मागील चार वर्षे या दोघांत छुपा सत्तासंघर्ष होता. कधी बोलले गेले की हा छुपा सत्तासंघर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसारच आहे. मात्र, पंकजा या मेटेंपुढे कधीही झुकल्या नाहीत. त्यामुळे राज्यात भाजप सरकारसोबत असले तरी जिल्ह्यात मेटेंची कुंचबणा होत होती. पंकजा एकीकडे मेटेंना शह देत राहिल्या तर दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर यांच्याशी संधान साधून राहिल्या. दोघांतील शीतयुद्ध पेटतच राहिले.

मागील महिन्यात विनायक मेटेंनी राज्यात युतीसोबत राहणार पण बीडमध्ये भाजपला पाठिंबा देणार नाही असे सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकातदादा पाटील यांनी युतीसोबत राहायचे असेल तर बीडसह राज्यात सोबत राहा असे सुनावले होते. त्यानंतर मेटेंनी शांत राहणे पसंत केले होते. मात्र, मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे आमदार व मेटेंचे मतदारसंघातील प्रतिस्पर्धी जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ. प्रीतम मुंडे यांना पाठिंबा जाहीर केल्याने मेटेंना थेट व निर्णायक भूमिका घेण्यावाचून पर्यायच राहिला नव्हता. अखेर त्यांनी आज बीड राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंगअप्पा सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शह देत त्यांचाच पुतण्या संदीप क्षीरसागर यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जयदत्त भाजपमध्ये गेल्यास या चुलत्या-पुतण्यात विधानसभेची लढत होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे मेटेंचे काय व त्यांनी राष्ट्रवादीला कोणत्या मुद्यावर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला याची उत्सुकता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button