breaking-newsमहाराष्ट्र

विनय कोरेंनी ‘वारणा’ला जागतिक केले – जयंत पाटील

वारणानगर – तात्यासाहेब कोरे यांचा सहकारातील त्याग शेतकऱ्यांना वरदान ठरला. तात्यासाहेबांनी घालून दिलेले सूत्र तिसऱ्या पिढीतील विनय कोरेंनी सुरू ठेवण्याचे काम केले. ‘वारणा’वर अनेक अडचणी आल्या. पण त्यातून मार्ग काढण्याचे काम कोरेंनी केले. त्यांनी ‘वारणा’ला जागतिक दर्जा देण्याचे काम केले, असे मत माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे विनय कोरे यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापिठाने डी.लिट. पदवी दिल्याबद्दल येथील सहकारी व शिक्षण संस्थाच्या संयुक्त विद्यमाने विनय कोरे यांचा सत्कार झाला. त्यानंतर ते
बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, ‘‘संकटावर मात करण्याचे काम करण्यात कोरेंचा हातखंडा आहे. वारणा समूहातील संस्थाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. खासगी कारखानदारीमुळे सहकारातील साखर कारखाने अडचणीत येत आहे. सहकार आणि खासगीमध्ये शासन दुजाभाव करते. एफआरपीपेक्षा जास्त दर दिल्यास शासन कर लावते. पण खासगी कारखान्यांना कर लावला जात नाही.’’ खासगीप्रमाणे सहकारला अधिकार द्या. सहकार चळवळ टिकविण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले.

सत्काराला उत्तर देताना विनय कोरे म्हणाले, ‘‘हा सन्मान तात्यासाहेब कोरे यांनी १९५४ पासून केलेल्या सहकारातील योगदानाचा आहे. वारणा परिसरातील ६९ गावांच्या सहकार्यामुळे वारणा चळवळ यशस्वी झाली. ‘वारणा’मुळे प्रत्येक गावे पर्यायाने शेतकरी सक्षम झाले. तात्यासाहेबांना बाजीराव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्यानेच चळवळ यशस्वी झाली. १२०० टनाचे गाळप करणारा वारणा कारखाना आज १२ हजार टन गाळप करतो. ही प्रगती आहे. सध्या संकुचित वृत्ती निर्माण झाली आहे. दूरदृष्टी राहिलेली नाही. यामुळे सहकार अडचणीत येऊ शकते. कारखानदारीत खाजगी कारखानदारीशी इर्ष्या सुरु आहे. सामान्य मनुष्य मालक असलेली कारखानदारी टिकली पाहिजे. राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांनी प्रास्ताविकात साठ वर्षातील वारणा समूहाच्या वाटचालीचा आढावा घेतला. श्री. कोरे याना बहाल केलेल्या मानपत्राचे वाचन सौ. बी. डी. पाटील यांनी केले. माजी आमदार मानसिंग नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.

वारणा अध्यक्ष एन. एच. पाटील, वारणा बॅंकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, संचालक प्रकाश पाटील, रावसाहेब पाटील, गोविंद जाधव, सुरेश पाटील, एच. आर. जाधव, एन. आर. पाटील, दीपक पाटील, बी. के. पाटील, संजीव पाटील, शामराव पाटील, संजय कोरे, रणजीत पाटील, वारणा आणि राजारामबापू संस्था समूहातील पदाधिकारी, ग्रामस्थ  उपस्थित होते. डॉ. सुरज चौगुले, सूवर्णा आवटी यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. डी. के. पाटील यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button