विद्यार्थ्यांनी कौशल्यांच्या आधारावर शिक्षण घ्यावे!

- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन
- राज्य शासनाचा कल चाचणी उपक्रम सुरु
- “महाकरियर मित्र’ संकेतस्थळाचे उद्घाटन
पिंपरी – विद्यार्थ्यांचे कौशल्य लक्षात घेवून त्या-त्या कौशल्यांच्या आधारावर शिक्षण घेवून जीवनात यशस्वी व्हावे, असे मत शालेय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.
पिंपरी येथे महाराष्ट्र शासन आणि श्यामची आई फॉडेशन यांच्या वतीने कल चाचणी 2017 या उपक्रमातंर्गत दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा कल चाचणी अहवाल डाऊनलोड करण्यासाठी विकसित केलेल्या “महाकरियरमित्र’ या संकेतस्थळासह (www.mahacareermitra.in) आणि मोबाईल ऍपचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे, भारत देसड, शीतल बापट उपस्थित होते.
कल चाचणी हा अत्यंत महत्त्वपुर्ण उपक्रम असून, शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत योग्य ती निवड जोपासणारा सेतू आहे. हा उपक्रम विद्यार्थी व पालकांना करिअर निवडीसाठी मार्गदर्शक ठरला आहे. तसेच, देशात प्रथमच 2016 मध्ये राज्य मंडळाच्या दहावीच्या 15 लाख 47 हजार विद्यार्थ्यांनी 5 क्षेत्रीय अभिरुची कसोटी दिली होती. तर यंदा कल चाचणी 2017 या उपक्रमातंर्गत राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या बहिस्थ विद्यार्थ्यांसह एकूण 16 लाख 67 हजार 445 विद्यार्थ्यांनी नव्याने तयार करण्यात आलेली 7 क्षेत्रीय अभिरुची कसोटी हीकल चाचणी दिली. ही कसोटी त्या-त्या क्षेत्रातील अनुभवी तंज्ञाच्या सहभागाने व मागील वर्षीच्या प्रतिसादाने प्राप्त सुचनांनुसार नव्याने विकसित केलेली आहे. विशेषताः अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुध्दा त्यांचा कल असलेल्या क्षेत्राबाबत उपलब्ध संधी समजून घेता यावे. याकरिता महाकरियरमित्र पोर्टल व हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांला त्यांच्या करियरची निवड करण्यासाठी समान संधी मिळणार आहे.
पोर्टलवरुन मिळेल अपडेट माहिती
राज्य मंडळाच्रया इयत्ता दहावीच्या कल चाचणी दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या वर्षी “महाकरियरमित्र’ या पोर्टलवरुन त्यांचा कल अहवाल डाऊनलोड करता येणार आहे. कल अहवालानुसार त्या त्या क्षेत्रातील व्हीडिओ पाहून तज्ञाचे मार्गदर्शनपर लेख वाचून संबंधित क्षेत्राबाबत अधिक माहिती समजून घेता येईल. राज्यातील 19 हजारपेक्षा अधिक संस्था आणि 83 हजार अभ्यासक्रम यातून त्यांचा कल क्षेत्रानूसार जिल्ह्यांतील शासनमान्य महाविद्यालयात अभ्यासक्रम शोधता येणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना अडचण येवू नये, याकरिता हेल्पलाईन क्र. 8600245245 व 020-49294929 वर मार्गदर्शन घेता येणार आहे.