breaking-newsताज्या घडामोडीपुणे

विद्यार्थ्यांना चोवीस तास “वैद्यकीय इमर्जन्सी’ सेवा

  • विद्यापीठ आरोग्य केंद्र होणार सक्षम : पुरेशा मनुष्यबळासाठी आर्भिक तरतूद

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आरोग्य केंद्र सक्षम करण्यावर विद्यापीठ प्रशासनने भर दिला आहे. विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या पाहाता आरोग्य केंद्रात चोवीस तास उपचारासाठी अत्यावश्‍यक सेवा (इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पुरेशा मनुष्यबळासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून, त्यादिशेने विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. त्यामुळे आरोग्य केंद्र हे लवकरच विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध राहणार असल्याचे चिन्हे आहेत.

विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच विद्यार्थ्यांसाठी चोवीस तास अत्यावश्‍यक सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी काही स्टाफ देखील नव्याने भरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे लवकरच आरोग्य केंद्र अद्ययावत होणार आहे. – डॉ. शशिकांत दुधगावकर, वैद्यकीय अधिकारी, पुणे विद्यापीठ

विद्यापीठ आवारातील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आरोग्य केंद्र आहे. विद्यापीठामध्ये आजमितीस 54 विभाग कार्यरत आहेत. एका विभागामध्ये सरासरी 50 ते 55 विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांची संख्या पाहाता कोणत्याही वैद्यकीय उपचारासाठी विद्यार्थीही आता आरोग्य केंद्राकडे वळत आहे. त्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. त्यातुलनेत आरोग्य केंद्रात पुरेसा मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना अपुऱ्या स्टाफच्या मदतीने विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार करावे लागत आहे. त्याचा ताण आरोग्य केंद्रावर होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यानच्या काळात आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध नसल्याच्या कारणावरून विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर मात्र आरोग्य केंद्राची सध्याची स्थितीचा आढावा घेत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी त्याला सक्षम करण्याठी पाऊले उचलली. त्यानंतर काही महिन्यांत ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिली. त्यामुळे वेळेत उपचार मिळणे शक्‍य झाले आहे.
सध्यस्थितीत आरोग्य केंद्रात प्रत्येक आजारांवर तज्ज्ञांकडून उपचाराची सुविधा आहे. त्यासाठी बाहेरून वैद्यकीय तज्ज्ञ केंद्रात येतात. एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांना समुपदेशन करीत असतात. वैद्यकीय सेवासह प्राथमिक औषधोपचारही अल्पदरात विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या अद्ययावत प्रयोगशाळा, लॅबॉरेटरी, एक्‍स-रे व संबंधित क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञ कार्यरत आहेत. आणखी मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास, आरोग्य केंद्राच्या कार्याला गती मिळण्याची शक्‍यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button