विकास कामांसाठी तब्बल पाच कोटी खर्चाला स्थायी समितीची मान्यता

पिंपरी – विविध विकास विषयक कामे करण्यासाठी सुमारे ५ कोटी २१ लाख ४५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी (दि. 30) मान्यता देण्यात आली.
स्थायी समिती सभागृहात सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. प्रभाग क्र. ३१ मॅगजीन चौक उद्यान विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे २७ लाख १७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १२ मधील से. क्र.२२ ओटा स्किमच्या विकसीत झालेल्या इमारतीच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी व देखभालीची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ३० लाख ९६ हजार, प्रभाग ४४ मधील हेमू कलानी उद्यानात शहीद हेमू कलानी यांचा पुतळा उभारण्यासाठी सुमारे २५ लाख ८९ हजार, ग प्रभागातील जलनीःसारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने साफसफाई करणे व चोकअप काढण्यासाठी सुमारे ४६ लाख ७४ हजार, महापालिकेस जेएनएनयूआरएम अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनसाठी शासनाकडील मंजूर निधीमधून यांत्रिक पध्दतीने रस्ते सफाई करण्यासाठी सुमारे १ कोटी ४० लाख रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली.
मनपाचे विद्युत विभागासाठी आवश्यक विविध एसी वॉटर कुलर्स आणि फॅन्स साहित्य खरेदीकामी सुमारे २५ लाख ८७ हजार, दि. २६ जानेवारी २०१८ रोजी भक्ती-शक्ती चौक निगडी येथे उदघाटनसाठी बिस्किट व पाणी बॉटल खरेदीसाठी सुमारे २७ हजार, मनपाच्या माध्यमिक विद्यालयासांठी सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी ते ८ वी व ९ वी ते १० वीच्या मराठी, इग्रंजी. उर्दु माध्यमासाठी क्रमिक पुस्तके खरेदी करण्यासाठी सुमारे २१ लाख ८० हजार, मनपाच्या माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत असलेल्या १८ माध्यमिक विद्यालयातील व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मुलांचे मोरवाडी, मुलींचे कासारवाडी मधील विद्यार्थ्यांना बिस्किट व पाणी बॉटल खरेदी करण्यासाठी सुमारे ८२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली आहे.
जिल्हास्तर शालेय हॉकी स्पर्धा २०१८-१९ अनुषंगाने २५० विद्यार्थी खेळाडूंचे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम नेहरूनगर, पिंपरी येथे उन्हाळी हॉकी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यासाठी सुमारे ०६ लाख ५६ हजार, मनपाच्या विद्युत मुख्य कार्यालयाकडील एल.ई.डी. दिवे बसविणेकामी सुमारे २९ लाख ९५ हजार, स्थापत्य विभागाकडील क्रांतीवीर चापेकर वाड्याच्या तिस-या टप्प्याची कामे करण्यासाठी सुमारे ४३ लाख १४ हजार, स्थापत्य विभागाकडील प्रभाग १८ मध्ये ताब्यात येणारी आरक्षणे विकसीत करण्यासाठी सुमारे २० लाख ३१ हजार, अधिकारी व कर्मचा-यांच्या सेवानिवृत्ती गौरव प्रित्यर्थ समारंभसाठी सुमारे ०३ लाख, ह प्रभागातील जलनिःसारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने साफसफाई करणे व चोकअप काढण्यासाठी सुमारे ९८ लाख ९७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.