breaking-newsपुणे

वाहन ‘पार्किंग’साठी मोजावे लागणार शुल्क

पिंपरी – शहरातही रस्त्यावर वाहने लावण्यासाठी तासाप्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे. तसे नवे पार्किंग धोरण पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केले आहे. सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन त्यांची शहरात अंमलबजावणी केली जाणार आहे.

शहराची लोकसंख्या 21 लाखांच्या पुढे पोहचली आहे. वाहनांची संख्या 15 लाख 68 हजार आहे. त्यामध्ये दुचाकी वाहने 11 लाख 69 हजार आणि चारचाकी वाहने 2 लाख 54 हजार आहेत. एकूण 21 लाख लोकसंख्येसाठी 15 लाख वाहने आहेत. त्यामुळे शहरात  पार्किंग समस्या निर्माण झाली आहे. दिल्ली, चेन्नई, मुंबई, बंगळूर, नागपूर आणि पुणे या मोठ्या शहरांमध्ये पार्किंग धोरण आखून सार्वजनिक पार्किंगच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी दर आकारणी करण्यात येणार आहे.

या पार्किंग धोरणात अत्याधुनिक पार्किंग तंत्रज्ञानाचा वापर करून पार्किंग मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे. त्याद्वारे वाहनतळावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत.

सार्वजनिक पार्किंग सुरू करून क्षेत्रीय कार्यालयामार्फत पार्किंगची शुल्क वसुली करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. पार्किंग करावयाचे रस्ते आणि शुल्क याबाबत दर 2 वर्षांनी आढावा घेऊन त्यात बदल करण्यात येतील. विकास आराखड्यातील पार्किंगसाठी आरक्षित जागा विकसित केली जातील. पार्किंगच्या मागणीनुसार चार झोन तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांचे शुल्क दर निश्‍चित केले आहे. आवश्यकतेनुसार पार्किंगसाठी पुण्याप्रमाणे इमारती बांधण्याचे नियोजन आहे.

शहरातील सर्व बीआरटीएस रस्ते, पिंपरी कॅम्प, भोसरी गाव, नाशिक फाटा चौक, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, आकुर्डी रेल्वे स्थानक परिसर, देहू-आळंदी रस्ता, प्राधिकरण परिसर, भूमकर चौक ते केएसबी चौक रस्ता या ठिकाणी पार्कींग असणार आहे. या ठिकाणी वाहने लावण्यासाठी वाहनचालकांस तासांप्रमाणे शुल्क द्यावे लागणार आहे.  शहरातील गावठाणाचा भाग, झोपडपट्टी आदी भागांमध्ये पार्किंग धोरण नसणार आहे. येत्या दोन वर्षांतील त्या परिसराचा अभ्यास करून आवश्यकतेनुसार हे धोरण त्या ठिकाणी लागू करण्यात येईल.

सशुल्क पार्किंगचे दर

दुचाकीसाठी 2 रुपये , रिक्षासाठी 6, चारचाकी मोटारीसाठी 10, टेम्पोसाठी 10, निमी बससाठी 15, ट्रकसाठी 33 आणि खासगी बससाठी 39 रूपये शुल्क प्रत्येक तासाला असणार आहे. सायकल, रुग्णवाहिका, दिव्यांगांची वाहने, मान्यताप्राप्त रिक्षाथांबे यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. रात्री 11 ते सकाळी 8 या वेळेत निवासी पार्किंगसाठी 25 रूपये दर दिवसाला शुल्क असणार आहे. वार्षिक परवाना 9 हजार 325 रूपये असणार आहे. त्यामुळे स्वत:ची पार्किंग नसलेल्या वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button