breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

वाहतूक कोंडीमुळे पोलिसाचा मृत्यू

हृदयविकाराच्या धक्क्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने प्राण गमावले; पोदार रुग्णालयातील सुविधांवरही प्रश्नचिन्ह

उपचारासाठी रुग्णालयात नेणारे वाहन वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे मुंबई पोलीस दलातील एका हवालदारास प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असलेल्या सुधाकर बोटके (५०) यांना कार्यालयातच हृदयविकाराचा झटका आला. मात्र, नायर, केईएम, जेजे रुग्णालयांच्या मार्गावरील वाहतूक कोंडी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात झालेला विलंब यामुळे उपचारापूर्वीच बोटके यांचे निधन झाले. या दुर्दैवी घटनेनंतर मुंबईतील मेट्रोची कामे आणि लोअर परळ येथील पुलाच्या बांधकामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

गेली ३० वर्षे पोलीस दलात कार्यरत असलेल्या बोटके यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. गेल्या आठवडय़ात अमली पदार्थ विरोधी पथकाच्या बीडीडी वसाहतीतील कार्यालयात असताना बोटके यांच्या छातीत दुखू लागले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने पोलीस वाहनातून पोदार रुग्णालयात नेले. तेथे ईसीजी काढल्यानंतर बोटके यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचारांची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, पोदार रुग्णालयातील अतिदक्षता विभाग बंद असल्याने त्यांना केईएम, नायर किंवा जेजे येथे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला; परंतु या तिन्ही रुग्णालयांच्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने बोटके यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना नजीकच्या ग्लोबल रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला; परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच बोटके यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेने एकूणच व्यवस्थेतील अनेक त्रुटी उघडय़ा पडल्या आहेत. पोदार आयुर्वेदिक रुग्णालयात अतिदक्षता विभाग असता तर बोटके यांचे प्राण वाचू शकले असते. येथे येणाऱ्या गंभीर स्थितीतील रुग्णांनाही जुजबी उपचार देऊन जेजे, केईएम किंवा नायर रुग्णालयांत पाठवले जाते. मुंबईत सध्या अनेक ठिकाणी मेट्रोची तसेच पूल उभारणीची कामे सुरू आहेत.

त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर नेहमी वाहतूक कोंडी असते. त्यामुळे राज्य सरकारची १०८ टोल फ्री क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावली तरी तीही कोंडीत अडकून पडते, असे पोदार रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

सध्या महालक्ष्मी, वरळी परिसरांत मेट्रो प्रकल्प सुरू असल्याने वरळी नाक्यापासून महालक्ष्मीपर्यंत अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रहरी वाहतूक कोंडी असतेच. लोअर परळ पूल पुर्नबांधणीसाठी बंद असल्याने वाहतूक एल्फिन्स्टन पुलावरून वळवण्यात आली आहे. त्यामुळे तेथेही सदान्कदा वाहतूक कोंडी होते. म्हणजे महालक्ष्मीवरून वरळी नाका किंवा वरळी नाक्यावरून परळपर्यंत यायला अनेकदा दोन तासही लागतात.

बोटके यांच्या मृत्यूने पोलीस दलावरील ताण आणि अकाली जडणाऱ्या व्याधी, आजार हाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस आयुक्त सुबोधकुमार जैस्वाल यांनी एका मुलाखतीत पोलीस दल सशक्त असणे आवश्यक आहे आणि प्राधान्याने त्यासाठी उपाययोजना करणार, असे जाहीर केले होते. एकूण पोलीस मनुष्यबळाला नेमक्या कोणत्या व्याधी आहेत हे जाणून घेऊन त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय करण्याबाबतही जयस्वाल यांनी सांगितले होते.

‘अतिदक्षता’चा केवळ फलक

पोदार आयुर्वेदिक रुग्णालयात अतिदक्षता विभागाचा फलक आहे. काही वर्षांपूर्वी हा विभाग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यासाठी कोटय़वधी रुपयांची यंत्रसामग्रीही रुग्णालयाला उपलब्ध करून दिली होती. मात्र या विभागासाठी आवश्यक असलेल्या तज्ज्ञ मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे २०१६ मध्ये ही यंत्रसामग्री जे.जे. रुग्णालयाकडे वर्ग केली गेली.

रुग्णालयात अतिदक्षता विभागाची आवश्यकता आहे. जेजे रुग्णालयाशी संलग्न राहून हा विभाग सुरू करण्यात येणार होता. शासन पातळीवरून यंत्रसामग्रीही पाठवण्यात आली होती. मात्र अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांसह प्रयोगशाळा, एक्सरे अशा विभागांची उभारणीही आवश्यक होती. शासनाने २४ पदांना तत्त्वत: मान्यता दिलेली आहे. ती प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यास अतिदक्षता विभाग सुरू होऊ शकेल.

– वैद्य गोविंद खटी, अधिष्ठाता, म. आ. पोद्दार रुग्णालय

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button