वायूसेनेच्या कमांडरांच्या परिषदेचे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली – वायू सेनेच्या वायू भवन या मुख्यालयात संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते काल वायू सेनेतील कमांडर्सच्या पहिल्या द्वैवार्षिक परिषदेचे उद्घाटन झाले. एअरचीफ मार्शल बी.एस.धनोआ यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारामन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि संरक्षण सचिव संजय मित्रा यांचे स्वागत केले. यावर्षी एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या “गगनशक्ती’ या उपक्रमाबाबत तसेच वायू सेनेच्या सद्यस्थितीबाबत एअरचीफ मार्शल धनोआ यांनी संरक्षण मंत्र्यांना माहिती दिली. अलिकडच्या काळात भारतीय वायू सेनेने आयोजित केलेल्या “गगनशक्ती’ या उपक्रमाबाबत संरक्षण मंत्र्यांनी परिषदेला उपस्थित कमांडर्सचे कौतुक केले.
स्वदेशी निर्मितीचे महत्त्व अधोरेखित करताना संरक्षणमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या “मेक इन इंडिया’ कार्यक्रमाअंतर्गत येत्या 15 वर्षात संरक्षण विषयी दर्जेदार उत्पादने प्राप्त होतील असा विश्वास व्यक्त केला. उडान योजनेला सहाय्य देत राष्ट्र उभारणीच्या कामात वायू सेना महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही संरक्षण मंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.