‘वायसीएम’च्या पदव्युत्तर संस्थेच्या अधिष्ठाता पदावर डाॅ. राजेंद्र वाबळे रुजू

- आयुक्तांनी सात महिन्यापुर्वी दिला होता आदेश, त्यांनी आता घेतला पदभार
- तीन वर्षासाठी हंगामी अधिष्ठाता म्हणून दिली नियुक्ती
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये नियोजित पदव्युत्तर संस्थेच्या हंगामी अधिष्ठाता म्हणून डाॅ. राजेंद्र वाबळे हे शुक्रवार (दि.3 मे) रोजी पदभार स्विकारला आहे. मात्र, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी वाबळे यांना 27 सप्टेंबर 2018 रोजी नियुक्ती आदेश दिला होता. त्यामुळे तब्बल सात महिन्यानंतर त्यांनी हंगामी अधिष्ठाता म्हणून पदभार स्विकारला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये नियोजित पदव्युत्तर संस्थेचे काम प्रगतीपथावर आहे. या संस्थेच्या विविध संवर्गातील एकूण 118 पद निर्मितीस मान्यता दिलेली आहे. तसेच शासन निर्णयामध्ये अधिष्ठाता या एका पदास मंजुरी दिलेली आहे. या पदासाठी एकूण 7 अर्ज प्राप्त झाले होते.
त्यातून मुलाखतीस उपस्थित राहिलेल्या तीन उमेदवारांच्या अर्जांची छाननी करुन सदर उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर बाबी विचारात घेऊन गठीत केलेल्या निवड समिती मार्फत अधिष्ठाता या पदासाठी डाॅ. राजेंद्र नामदेव वाबळे यांची हंगामी तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर 3 वर्षे कालावधीसाठी निवड केलेली आहे.
भारतीय आयुर्विज्ञान परिषद दिल्ली यांचेकडील अहवालातील त्रुटीची पुर्तता करणे आवश्यक असल्याने नियोजित पदव्युत्तर संस्थेकरीता डाॅ. राजेंद्र नामदेव वाबळे यांची अधिष्ठाता ( गट अ ) या पदावर एकत्रित मानधनावर 3 वर्षे कालावधीस महासभेच्या मान्यतेने नियुक्ती केली आहे.
त्यानुसार महानगरपालिका आयुक्तानी वायसीएमच्या पदव्युत्तर संस्थेच्याअधिष्ठाता पदावर डाॅ. राजेंद्र वाबळे यांना दरमहा 1 लाख 67 हजार 950 या एकत्रित मानधनावर 27 सप्टेंबर 2018 ते 26 सप्टेंबर 2021 या 3 वर्षे कालावधीकरिता अटी व शर्तीवर अधिष्ठाता पदावर नियुक्ती दिली आहे. त्यामुळे डाॅ. वाबळेंनी त्यांना दिलेल्या नियुक्ती आदेशानंतर 7 महिन्यानंतर अधिष्ठाता पदाचा पदभार स्विकारला आहे.