वायसीएमची सुरक्षा रामभरोसे ; रुग्णाने मारली दुस-या मजल्यावरुन उडी

वायसीएम रुग्णालयातील दीड महिन्यातील दुसरी घटना
पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एका रुग्णाने सोमवारी (दि.4) दुपारी साडेतीनच्या सुमारास रुग्णालय इमारतीच्या दुस-या मजल्यावरुन उडी मारली. चक्क दिवसा ढवळ्या रुग्ण आत्महत्येचा प्रयत्न करु लागले आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. दरम्यान, सदरील रुग्ण दारुच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्याने हे कृत्य केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. संबंधित रुग्णाचे दोन्ही हात फ्रॅक्चर, डोळ्यासह तोंडाला गंभीर दुखापत झालेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम गणेश शिंदे (वय 29 रा. नाणेकरचाळ, पिंपरी) हा दारुच्या आहारी गेला होता. त्याला दारु न मिळाल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. संबंधित रुग्णाला रविवारी (दि.3 जून ) वायसीएममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर तिस-या मजल्यावरील 302 वॅार्डामध्ये उपचार चालू होते. मात्र, सोमवारी (दि.4 जून) त्याने रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच तो तिस-या मजल्यावरुन खालील दुस-या मजल्यावर येवून रुग्णालय इमारतीवरुन दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास उडी मारली. मात्र, खाली ठेवलेल्या कच-याच्या डक्ट तो पडल्याने बचावला आहे. त्यांच्या दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली असून खाली पडल्यानंतर मोठा आवाज झाल्याने ही घटना उघडकीस आली. त्या रुग्णावर तुर्तास रुग्णाला अतिदक्षता विभागात हलवले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील दीड महिन्यातील दुसरी घटना घडली आहे. यापुर्वी देखील एका रुग्णाने उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसून त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे दिसत आहे. त्याशिवाय वॅार्डातून रुग्ण पळून गेल्यानंतरही प्रशासनातील रुग्णालयीन कर्मचा-यावर कोणतीही कारवाई केलेली नसल्याचे दिसत आहे.