वाचावे ते नवल…व्हाट्स अॅप डीपीसाठी पतीविरुद्ध केली शोषणाची तक्रार

लखनौ : व्हाट्सअॅपवर आपल्यासोबतचा फोटो डीपी म्हणून ठेवला नाही, अशी तक्रार करत एका महिलेने आपल्याच पतीला पोलिस ठाण्यात खेचले. ही विचित्र घटना उत्तर प्रदेशातील साहिबाबाद येथे घडली. दरम्यान, पोलिसांनी महिलेचे समुपदेशन करून ही तक्रार निस्तरली.
साहिदाबाद येथे घडलेल्या या अजब घटनेने चर्चांना उधाण आले आहे. नवऱ्याने शोषण केले, अशी तक्रार एका महिलेने पोलिसांत केली होती. पण, यामागचे नेमेके कारण ती सांगत नव्हती. अखेर एका महिन्यानंतर पोलिसांनी सातत्याने विचारणा केल्यावर या महिलेने तक्रार करण्याचे कारण सांगितले.
काही दिवसांपूर्वी या महिलेने तिच्याच नवऱ्यासोबत काही फोटो काढले होते. नवऱ्याने हे फोटो व्हाट्स अॅप डीपी म्हणून ठेवावेत यासाठी तिने हट्ट धरला होता. पण, पतीराजाने तीचे ऐकले नाही. त्यामुळे चिडलेल्या या महिलेने थेट पोलिसांत धाव घेत शोषणाची तक्रार केली. यावर आता पोलिसांनी संबंधित महिलेचे समुपदेशन केले. त्याचा परिणाम सकारात्मक झाला आणि संबंधित महिलेने आपली तक्रार मागे घेतली.