वाकडमध्ये टेंपो विहिरीत उलटला

पिंपरी – वाकड येथील विनोदे नगर ते अक्षरा शाळेपर्यंतचा डीपी रस्त्याचे काम कित्येक दिवसापासुन रखडले आहे. त्या रस्त्यावर असलेल्या एका विहीर शनिवारी (दि.2) मध्यरात्री बाराच्या सुमारास एक मालवाहतूक करणारा टेम्पो उलटला आहे. महापालिका स्थापत्य विभागाच्या गलथान कारभाराचा फटका वाहन चालकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.
संत तुकाराम कार्यालय ते ताथवडे हा २४ मीटर डीपी रस्त्याचे काम तीन वर्षांपासून सुरु आहे. या अर्धवट असलेल्या रस्त्यावरच २० ते २५ फूट खोलविहिर आहे. त्या विहिरीला कुठलेही संरक्षण कठडे अथवा आवरन नाही. महापालिका रस्त्याचे काम पुर्ण करीत नाही. तसेच त्या रस्त्यात असलेली विहीर देखील बुजवित नाही. त्या विहीरला कठडे देखील घालण्यात न आल्याने शनिवारी या विहिरीत अवजड मालाने भरलेला टेंपो पडला. चालक बाळू काळे याचे नशीब बलवत्तर म्हणूनच तसेच विहिरीत पाणी नसल्याने या अपघातातून सुखरूप बचावला. त्याला स्थानिक तरुणांच्या मदतीने वर काढण्यात आले. तर क्रेनच्या सहाय्याने रविवारी सकाळी टेंपो विहिरीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.