वऱ्हाडीच्या वेशात आलेल्या पोलिसांनी सराईताला केली अटक

पिंपरी ( महा ई न्यूज ) – जबरी चोरी आणि वाहन तोडफोडीच्या घटनेतील फरार सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी पोलिसांना चक्क वऱ्हाड्यांच्या वेशात येऊन अटकेची कारवाई केली. विशेष म्हणजे पोलिसांनी सराईत ज्या लग्नात आला होता. ते लग्न सुखरुप पार पडल्यानंतर ही कारवाई केली.
ऋतिक उर्फ फिरंग्या श्रीधर सोळंकी असे अटक केलेल्यांचे नाव आहे. त्याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात वाहन तोडफोडीसह जबरी चोरी आणि हत्येचा प्रयत्नसारखा गंभीर गुन्हा दाखल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी जुन्या सांगवीत वाहनाची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात ऋतिक उर्फ फिरंग्या हा आरोपी होता. तो पोलिसांना नेहमी चकवा देत फरार होत असे. सोमवारी आरोपी ऋतिक उर्फ फिरंग्या याच्या नातेवाईकाच्या मुलीचे लग्न होते. आरोपीच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाचे लग्न होते. त्यामुळे तो येणार असल्याची खात्री पोलिसांना होती. त्यानुसार साध्या गणवेशात पोलीस विवाहस्थळी वऱ्हाडी म्हणून दाखल झाले.
काही पोलीस मुख्य गेटवर थांबले होते. तर काही पोलीस कर्मचारी, अधिकारी लग्न कार्यालयात आरोपी ऋतिकला शोधत होते. फोटोवरून त्याची ओळख पटली. तेथील नातेवाकांनी पोलिसांना हटकले तेव्हा, आम्ही मुलीकडील वऱ्हाडी असल्याचे अधिकाऱ्यांनी उत्तर दिले. पोलिसांनी जेवणावर ताव मारला आणि माणुसकी म्हणून विवाह होईपर्यंत आरोपीला अटक केली नाही. आरोपीला या बद्दल काहीच कल्पना नव्हती. अचानक पोलिसांनी त्याला घेराव घालत लग्नमांडवातून अटक केली.