breaking-newsपुणेमहाराष्ट्र

वर्षभरापासून थकलेली शिष्यवृत्ती मिळणार

  • आदिवासी विकास विभागाकडून सूचना

  • पात्र विद्यार्थ्यांनाही 5 जूनची डेडलाईन

पुणे- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2017-18 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्‍कम येत्या दि. 20 जूनपर्यंत महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थांकडे पाठविण्यात यावे, अशा सूचना राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्षभरापासून शिष्यवृत्तीपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना जून महिन्यात शिष्यवृत्ती मिळण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. त्यांची सविस्तर माहिती, आवश्‍यक हमीपत्रे याची त्वरित पूर्तता करून घ्यावे, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. तर ज्या महाविद्यालयांनी आत्तापर्यंत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज पाठविले नाहीत. त्यांना दि. 5 जून ही अंतिम डेडलाईन देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, परीक्षा फी प्रदाने, निर्वाह भत्ता) दिली जाते. 2017-18 या शैक्षणिक वर्षामधील पात्र विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक अर्ज मार्च 2018 अखेर निकाली काढण्यात आले आहेत. मात्र, काही अर्ज प्रलंबित असून, काही महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थांना शिष्यवृत्तीची रक्‍कम अद्याप प्राप्त झालेली नाही. ती त्वरित देण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पूर्ण तपासून आणि प्राचार्य यांच्या हमीपत्रासह संबधित विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे.

ज्या महाविद्यालयांनी यापूर्वी हमीपत्रासह अर्ज सादर केले असतील तर पुन्हा अर्ज सादर करण्याची गरज नाही. शिष्यवृत्तीची रक्‍कम ही विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे, त्यामुळे त्या विद्यार्थ्याचे खाते “आधार’शी जोडले आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, अशा सूचना या आदेशामध्ये दिल्या आहेत. तसेच 2017-18 या शैक्षणिक वर्षामध्ये संबंधीत विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाने शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क घेतलेले नसल्याचे हमीपत्र प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. प्रकल्प अधिकारी यांच्याकडून अर्जाची तपासणी झाल्यावर ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. ते विद्यार्थी वगळून उर्वरित पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्‍कम दि. 20 जूनपर्यंत संबंधीत महाविद्यालयांना देण्यात येणार आहे. त्यामुळे मागील वर्षांपासून वंचित असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.

येत्या 5 जूनपर्यंत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज पाठवावे
शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाने त्वरित मंजूर करून, येत्या दि. 5 जूनपर्यंत संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्या पाठवावे. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. पात्र विद्यार्थ्यांकडून मूळ कागदपत्रांची तपासणी करण्याची जबाबदारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची असेल. तसेच शिष्यवृत्तीची रक्‍कम महाविद्यालयाला मिळाल्यानंतर एकाच विद्यार्थ्याला दोनवेळा शिष्यवृती दिली जात नाही ना याची दक्षता घ्यावी, असे आदेश राज्य शासनाच्या आदिवासी विभागाकडून सर्व महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button