वडिलांनी गाडीची चावी दिली नाही म्हणून MBA झालेल्या मुलाने केली आत्महत्या

वडिलांनी गाडीची चावी देण्यास नकार दिला म्हणून दारुच्या नशेत असलेल्या मुलाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. भोपाळच्या अवधपुरीमध्ये बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. शैलेंद्र सिंह सोनखिया (२७) असे मृत मुलाचे नाव आहे. एमबीए पदवीधर असलेला शैलेंद्र सध्या बेरोजगार होता. शैलेंद्रचा एक एप्रिल रोजी वाढदिवस होता. पण आजोबा आजारी असल्यामुळे त्याला वाढदिवस साजरा करता आला नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
शैलेंद्रचे आई-वडिल भूपेंद्र आणि गीता सिंह उत्तर प्रदेश ललितपूरमध्ये सरकारी शिक्षक आहेत. घटनेच्या दिवशी शैलेंद्रला त्याच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी जायचे होते. शैलेंद्रची दारु पिण्याची सवय त्याच्या आई-वडिलांना माहित होती. एकदा शैलेंद्र गेला की, पुढचे दोन-तीन दिवस तो दारु पीत राहणार हे त्याच्या वडिलांना माहित होते.
शैलेंद्रने गाडीची चावी मागितली. पण दारु पिऊन गाडी चालवताना अपघात होऊ शकतो म्हणून त्याच्या वडिलांनी चावी देण्यास नकार दिला. त्यावरुन घरात मोठा वाद झाला. शैलेंद्रने टीव्ही आणि घरातील सोफा सेट तोडून टाकला. त्यानंतर तो घरातून निघून गेला व दहा मिनिटांनी परत आला.
तो घरी आल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायला व आपल्या रुममध्ये निघून गेला. शैलेंद्र सामन्य झाला आहे असे त्याच्या कुटुंबियांना वाटले. पाच मिनिटांनी शैलेंद्रच्या रुममधून गोळी चालवण्याचा आवाज आला. कुटुंबिय त्याच्या खोलीच्या दिशेने धावले पण त्याने आतून रुम बंद केली होती. कुटुंबियांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा शैलेंद्र खाली पडलेला होता. त्याला लगेच रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. तीन भावंडांमध्ये शैलेंद्र मोठा होता. त्याचा एक भाऊ पुण्यात खासगी कंपनीत नोकरी करतो दुसरा भाऊ इंदूरमधून एलएलबी करत आहे.