वंचित आघाडीच्या चिन्हात नरेंद्र मोदी अकस्मात

पुणे : बहुजन वंचित आघाडी ही भाजपची ‘बी टीम’ आहे, अशी टीका विरोधक कायमच करत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसने एक व्यंगचित्र ट्विट करत पुन्हा एकदा हाच आरोप केला आहे. या व्यंगचित्रात कप आणि बशीचे चिन्ह दाखवण्यात आले आहे. यामध्ये असदुद्दीन ओवेसी यांना बशीच्या आकारात दाखवण्यात आले आहे, तर प्रकाश आंबेडकरांना कपाच्या आकारात दाखवण्यात आले आहे. या कपात जो चहा आहे, त्यात नरेंद्र मोदी दाखवण्यात आले आहेत.
एवढेच नाही, तर एक कविताही या व्यंगचित्रासोबत ट्विट करण्यात आली आहे. ‘वंचितांच्या चिन्हात, रिपब्लिकन कपात, यमायमच्या बशीत, चहावाला अकस्मात’ अशा ओळीही या व्यंगचित्रात पोस्ट करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकांची लढाई सुरू झाली आहे, अशात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जशा रंगल्या आहेत, तसेच सोशल मीडियावर पोस्टची लढाईही रंगली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनीही भाजपची ‘बी टीम’ ही टीका फेटाळून लावली आहे. तसेच भाजपनेही हा आरोप नाकारला आहे. आता व्यंगचित्र पोस्ट केल्यानंतर बहुजन वंचित आघाडी आणि भाजपकडून या सगळ्याला कसे उत्तर दिले जाते, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.