लोकसेवा आयोगाच्या परीक्षेवेळी गॅझेटला बंदी

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून रविवार, ३ जून रोजी नागरी सेवा पूर्वपरीक्षा – २०१८ मुंबईमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षा उपकेंद्रावर कुठल्याही प्रकारचे मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गॅझेटसोबत बाळगण्यास परीक्षार्थींना बंदी राहील, असे मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित उपकेंद्रावर कुठल्याही प्रकारचे मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गॅझेट सोबत बाळगण्यास पूर्णपणे बंदी आहे. पोलिस कर्मचाऱ्यांकडून तपासणी करूनच परीक्षार्थ्यांना परीक्षा उपकेंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. परीक्षेची वेळ सकाळी ९.३० ते ११.३० वा. आणि दुपारी २.३० ते ४.३० वाजता आहे. परीक्षा सुरू होण्याच्या १० मिनिटे आधी उपकेंद्रावरील वर्गखोल्यांचे दरवाजे बंद करण्याबाबत आयोगाच्या सूचना आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.