
जय जय श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष पृथ्वीतलावर अखंडपणे सुरूच असतो. लाखो भक्तांची ही गुरू माऊली. अन्नपूर्णा देवता. तनमनाची शांती देणारी प्रेरक शक्ती. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ ही खरोखरच मानवाला समर्थशाली घडवितात. संजीवन देतात. जीवनाची दशा दिशेत परिवर्तन घडवून आणतात.
श्री नृसिंहसरस्वती ज्या कर्दळीवनात अंतर्धान पावले, तेथेच स्वामींचे अवतारित्व प्रकटले. ‘आपण कोठून आलात?’, या प्रश्नाला उत्तर देताना स्वामींनी सांगितले की, प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कोलकाता वगैरे शहरे पाहिली. बांगलादेश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. गंगातीरावरून फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. पुढे आम्ही गोदातीरी आलो. गोदावरीचे स्नान करून हिंडत-हिंडत हैद्राबादेस गेलो. तेथे काही दिवस राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर इथे जाऊन हिंडत मोहोळास आलो. तेथून सोलापुरास आलो. तेथे काही महिने राहून अक्कलकोटास आलो तो इथेच आहे.
इ.स. १४५९ मध्ये माघ वद्य प्रतिपदा या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त करून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. या कालावधीत मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ उभे केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली व वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट झाले. क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज.
तो दिवस होता. चैत्र शुद्ध व्दितिया. गुढीपाडवाचा दुसरा दिवस. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत. पूर्वेकडील प्रांतात पीठापूर येथे १४व्या शतकात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपला अवतार संपविताना ‘पुन्हा-भेटेन’ असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंहसरस्वती या नावाने कारंजानगर येथे (कारंजा-वऱ्हाड) जन्मास आले. त्यांच्या अवतारकार्याचा कालावधी इ.सन १३७८ ते १४५८ हा आहे. त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. इ. सन १४५७च्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्यावेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले. तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत. ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते ‘चौथा अवतार’ मानले जातात. श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य, तेज:पुंज होती. ते अजानुबाहू होते.
“स्वामीनु आपण कोण आहा?” असे एका भक्ताने विचारले असता त्यावेळी श्रीसमर्थ म्हणाले ‘मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर.’ . २२ वर्ष श्री स्वामींचे वास्तव्य अक्कलकोटमधील वटवृक्षाच्या छायेत होते. आज त्या पुण्यस्थळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर उभे आहे. पवित्र वटवृक्षाखाली श्रीच्या निगुण पादुका, शिवलिंग, श्री स्वामीची संगमवरी मंगलमूर्ती व स्वामींच्या स्मृती वस्तुने हा मंदिर परिसर स्वामीमय झाला आहे. त्याचे दर्शन होताच आपणही स्वामीमय होऊन जातो.





