लावारिस, भक्तांना मोती बिंदू नाही तर मोदी बिंदू झालाय, पार्थ पवार समर्थकांचे ट्रोलर्संना उत्तर

- लावारिसांनो, अरे डोळे फुटले की काय तुमचे?, त्यांना सॉक्स सुद्धा बूट दिसतो
पुणे – हा बघा महाराष्ट्राचा पप्पू, अशा दळभद्री उमेदवाराच डिपॉझिट जप्त व्हायला हवे. आमच्या आराध्य दैवतास बुट घालून हार घालतोय निर्लज्ज, याला कसं निवडून द्यायचं, तुम्हीच सांगा बरं अशा शब्दांत मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना ट्रोल केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ट्रोलर्संना चांगलेच प्रत्त्युत्तर दिले आहे.
भक्तांना मोती बिंदू झाला आहे, त्यामुळे त्यांना सॉक्स सुद्धा बूट दिसतो. तसं असेल तर बारामतीमध्ये सुनेत्रावहिनी पवार दरवर्षी मोतीबिंदू शिबीर ठेवतात. त्यामध्ये लावरिसांना मोफत उपचार करून दिला जाईल, अशा शब्दांत भाजपच्या ट्रोलर्संना पार्थ पवारांच्या समर्थकांनी उत्तर दिले आहे.
पार्थ पवार दोन दिवसापूर्वी एका मंदिरात गणेश दर्शन घेतले होते. मात्र, त्यावेळी त्यांच्या पायात काळ्या रंगाचे सॉक्स आहेत. हे सॉक्स कट साईजमधील असल्याने अनेकांना ते चप्पल, बुट घातल्यासारखे वाटले. त्यामुळे हा फोटो भाजपच्या ट्रोलर्संनी सगळीकडे पाठवायला सुरूवात केली. मात्र, आपण पायात घातलेले हे बुट नसून सॉक्स आहेत असे स्पष्टीकरण पार्थ पवारांच्या समर्थकांनी सोशल मिडियात दिले.
जरा माहिती घेत जा, नव्या पद्धतीचे सॉक्स बाजारात आहेत. उगाच ज्ञान पाजळू नका, लावारिस भक्तांना मोती बिंदू नाही तर मोदी बिंदू झालाय, यांना आता आमचे फक्त पायच दिसणार आहेत, अशा शब्दांत पार्थ पवार समर्थकांनी सोशल मिडियात प्रतिक्रिया केल्या आहेत.