लालचुटूक लिचीचा हंगाम सुरू!

कोलकात्याहून मार्केटयार्डातील घाऊक फळबाजारात आवक
लालचुटूक लिचीचा हंगाम सुरू झाला आहे. कोलकात्याहून मार्केटयार्डातील घाऊक फळबाजारात लिचीची आवक होत असून किरकोळ विक्रेते तसेच घरगुती ग्राहकांकडून लिचीला चांगली मागणी आहे.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फळबाजारात बुधवारी लिचीच्या चारशे खोक्यांची आवक झाली. पुण्यातील बाजारात विमानाने तसेच रेल्वेने लिची विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. बाहेरून लवचिक काटेरी आवरण आणि चवीला गोड अशा लिचीला चांगली मागणी आहे. एका खोक्यात आठ किलो लिची असते. घाऊक बाजारात ८ ते ९ किलोच्या खोक्याला १२०० ते १६०० रुपये असा भाव मिळाला, असे फळबाजारातील लिचीचे व्यापारी राजेश परदेशी यांनी दिली.
लिचीची लागवड कोलकात्ता तसेच बिहारमधील मुझफ्फरनगर या भागात मोठय़ा प्रमाणावर केली जाते. मे महिन्याच्या सुरूवातीला लिचीचा हंगाम सुरू होतो. जुलैपर्यंत हंगाम सुरू राहतो.
यंदा लिचीचा हंगाम वेळेत सुरू झाला आहे. उन्हाळी सुटय़ांमुळे किरकोळ ग्राहकांकडून लिचीला मागणी जास्त आहे. त्यामुळे हंगामाच्या पहिल्या टप्प्यात लिचीचे भाव तेजीत आहेत. पुढील आठवडय़ात लिचीची आवक आणखी वाढेल. त्यानंतर भाव थोडे कमी होतील, असेही परदेशी यांनी सांगितले.
पठाणकोटहून आवक
पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यात शेवटच्या आठवडय़ात पंजाबमधील पठाणकोट परिसरातून लिचीची आवक सुरू होईल. विमान तसेच रेल्वेने पाठविण्यात येणारी लिची फारफार एक, दोन दिवस टिकते. गेल्यावर्षी लिचीचा हंगाम वेळेत सुरू झाला होता, अशी माहिती राजेश परदेशी यांनी दिली.
लिचीचे प्रतिकिलोचे दर
- घाऊक बाजार- १२० ते १५० रुपये किलो
- किरकोळ बाजार- २०० ते २५० रुपये