लतादीदींना ‘या’ अभिनेत्रीच्या चित्रपटासाठी गायचंय गाणं

ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आजवर अनेक चित्रपटांसाठी आपला आवाज दिला आहे. त्यांच्या सुमधूर आवाजातील प्रत्येक गाण्याने त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. आपल्या चित्रपटामध्ये लतादीदींनी गाणं म्हणावं असं प्रत्येक दिग्दर्शक, निर्मात्यांची इच्छा असते. मात्र यावेळी लतादीदींनी स्वत:च एका अभिनेत्रीसाठी गाणं म्हणण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
लता मंगेशकर यांना चित्रपटांमध्ये फारसा रस नसल्याने त्या फार कमी चित्रपट पाहत असतात. त्यामुळे त्यांनी नुकताच नवोदित अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘धडक’ आणि अनिल कपूरच्या ‘फन्ने खां’ या चित्रपटाचा टीझर पाहिला. विशेष म्हणजे ‘धडक’ चित्रपटामध्ये जान्हवीने केलेला अभिनय लता मंगेशकर यांना भावला असून त्यांनी जान्हवीच्या आगामी चित्रपटामध्ये गाणं म्हणण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
‘बोनी आणि अनिल यांना मी चांगल्या प्रकारे ओळखते. आमचे चांगले घरोब्याचे संबंध असून बोनीच्या मुलीने जान्हवीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्याचं पाहून मला प्रचंड आनंद झाला आहे. श्रीदेवीच्या निधनानंतर जान्हवी आणि खुशी या दोघीच जणी त्याच्या आनंदाचं कारण आहेत. जान्हवी फार छान मुलगी असून तिच्या एखाद्या आगामी चित्रपटामध्ये गाणं म्हणणं पसंत करेन’, असं लता मंगेशकर म्हणाल्या.
दरम्यान, लता दीदींनी स्वत: ही इच्छा व्यक्त केल्यामुळे जान्हवीचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. त्यातच जान्हवीचा ‘धडक’ बॉक्स ऑफिसवर गाजत असून या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसातच ३३ कोटींची कमाई केली आहे.