रोनाल्डोचे पुनरागमन, पोर्तुगालची अल्जीरियावर मात

- रॅशफोडच्या कामगिरीमुळे इंग्लंडचा कोस्टा रिकावर विजय
- फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सराव सामने
लिस्बन – जगातील अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो संघात परतल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या पोर्तुगाल संघाने अल्जीरियाचा 3-0 असा फडशा पाडताना फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सराव फेरीत विजयी पुनरागमन केले. तसेच मार्कस रॅशफोर्डच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर कोस्टा रिकाचा 2-0 असा पराभव करताना इंग्लंडने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आपल्या कामगिरीबद्दल आशा उंचावल्या.
त्याआधी लिस्बन येथे पार पडलेल्या सराव सामन्यात रोनाल्डो खेळणार असल्याच्या वृत्तामुळे पोर्तुगालच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावल्याचे जाणवत होते. त्याचा परिणाम प्रत्यक्ष सामन्यांतही दिसून आला. पॅरिस सेंट-जर्मेन संघाचा अव्वल आघाडीवीर गोन्कालो ग्वेडेस याच्या दुहेरी गोलच्या जोडीला स्पोर्टिंग लिस्बन संघाचा मध्यरक्षक ब्रूनो फर्नांडिसने केलेल्या गोलमुळे पोर्तुगालने अल्जीरियाचा एकतर्फी पराभव केला.
सराव फेरीतील याआधीच्या दोन्ही सामन्यांमध्ये रोनाल्डोच्या गैरहजेरीत खेळताना पोर्तुगालला बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. त्यातील पहिल्या सराव सामन्यात ट्युनिशियाने पोर्तुगालला 2-2 असे रोखले होते. तर बेल्जियमविरुद्ध गोलशून्य बरोबरीची कोंडी पोर्तुगालला फोडता आली नव्हती. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील अंतिम फेरीत अप्रतिम कामगिरी करून रिअल माद्रिदला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर थोडी विश्रांती घेऊन रोनाल्डो आजच्या सामन्यात सहभागी झाला.
पोर्तुगालकडून रोनाल्डोचा हा 150वा आंतरराष्ट्रीय सामना होता. रोनाल्डो मैदानात असेपर्यंत पोर्तुगालच्या प्रत्येक चालीत त्याचा वाटा होता. तसेच पोर्तुगालची प्रत्येक चढाई रोनाल्डोच्या सहभागामुळे धोकादायक वाटत होती. अखेर 74व्या मिनिटाला पोर्तुगालच्या प्रशिक्षकांनी रोनाल्डोला विश्रांती दिल्यावर अल्जीरियाने निश्वास सोडला.
दुसऱ्या सराव सामन्यांत इंग्लंडने कोस्टा रिकावर 2-0 अशी मात करताना सुमारे वर्षभरापूर्वीपासून सुरू असलेली 10 सामन्यांतील अपराजित वाटचाल कायम राखली. रॅशफोर्डच्या कामगिरीमुळे इंग्लंडला कर्णधार हॅरी केन याची अनुपस्थिती फारशी जाणवली नाही. याआधीच्या सामन्यात नायजेरियावर 2-1 असा विजय मिळविणाऱ्या संघात इंग्लंडचे प्रशिक्षक साऊथगेट यांनी तब्बल 10 बदल केले होते.