रोटोमॅक ग्रुपची 177 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

नवी दिल्ली – कानपुर स्थित रोटोमॅक कंपनीवर आज मनिलॉड्रिंग प्रकरणात सक्त वसुली विभागाने म्हणजेच ईडीने कारवाई करून त्यांची 177 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या कंपनीने बॅंकांचे एकूण 3695 कोटी रूपयांचे कर्ज घेऊन ते बुडवले असल्याची तक्रार आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी या कंपनी समुहाची कानपुर, डेहराडून, अहमदाबाद, गांधीनगर आणि मुंबई येथील एकूण 177 कोटी रूपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. फसवणुकीच्या व्यवहारातूनच या मालमत्ता जमवण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे आहे. ही कंपनी विक्रम कोठारी यांच्या मालकीची आहे. बॅंकेच्या लेटर ऑफ क्रेडीट सुविधेचा वापर करून त्यांनी बॅंकांची ही फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
विदेशातील कंपन्यांशी खोटा व्यापार दाखवून त्यांनी ही फसवणूक केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या प्रकरणात या कंपनीच्या विरोधात गेल्या फेब्रुवारी महिन्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅंक ऑफ बडोदाने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ईडीने विक्रम कोठारी, त्यांची पत्नी साधना कोठारी, आणि मुलगा राहुल कोठारी यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले होते. या कंपनीने बॅंकांकडून अशा प्रकारे 2919 कोटी रूपये मिळवले आणि त्यावरील व्याज धरून ही फसवणुकीची रक्कम 3695 कोटी रूपये इतकी झाली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या घोटाळ्यानंतर उघडकीला आलेला हा दुसरा मोठा फ्रॉड आहे.