Mahaenews

रेल्वेत जम्बोभरती; १ लाख पदे भरणार!

Share On

नवी दिल्ली : रेल्वेत सुरक्षाविषयक सुमारे १ लाख पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. गेल्या काही दशकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर भरती रेल्वेत झालेली नाही. अलिकडच्या काळात सातत्याने झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने ही जम्बो भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या १ लाख पदांपैकी तब्बल ४१ हजार रिक्त पदे गँगमनची आहेत.
रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाचा पदभार हाती घेतलेल्या पियुष गोयल यांनी ही जम्बो भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. अलिकडेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत गोयल यांनी या भरतीप्रक्रियेचा वेग वाढवण्याची सूचना केल्याचे समजते. ही भरती एक वर्षाच्या कालावधीत केली जाणार आहे. आधी २५ हजार पदे भरण्याचा निर्णय झाला होता. पण गोयल यांनी एक लाख पदे भरण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला.
संसदीय समितीने केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात रेल्वेची सुरक्षाविषयक सव्वा लाख पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या अहवालानुसार, १ एप्रिल २०१६ पर्यंत रेल्वेत एकूण २ लाख १७ हजार ३६९ पदे रिक्त आहेत, यापैकी १ लाख २२ हजार ७६३ पदे सुरक्षाविषयक आहेत. या सुरक्षाविषयक पदांपैकी ४७ हजार अभियंत्यांची तर ४१ हजार गँगमनची आहेत.

 सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांनंतर रेल्वे मंत्रालय खडबडून जागे झाले आहे. गॅंगमनच्या अपुऱ्या संख्येमुळे रेल्वे रुळांची नियमित पाहणी केली जात नसल्याचेही या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुढे आले होते. यामुळे ही पदे तातडीने भरण्याचा निर्णय झाला आहे.

Exit mobile version