राहुल गांधींच्या विरोधात भाजप खासदारांचा हक्कभंग प्रस्ताव

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर खोटे आरोप केल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षाच्या चार लोकसभा सदस्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आज दाखल केला. त्यावर अभ्यास करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी दिली.
प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लगेचच निशीकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्यावरील हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावर अनुराग ठाकूर, दुष्यंत सिंग, प्रल्हाद जोशी यांच्या सह्या आहेत. त्यावर सभापती सुमित्रा महाजन यांनी सांगितले की आपण त्याचा अभ्यास करून नंतर त्याच्यावर निर्णय देऊ. राफेल करार गुप्त ठेवण्याचा निर्णय झाला आहे अशी माहिती संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधानांच्या दबावाखाली दिली.
तथापी राफेल करार गुप्त ठेवण्याचे ठरलेलेच नाही असे खुद्द फ्रांसच्या अध्यक्षांनी आपल्याला सांगितले आहे असे राहुल गांधी यांनी लोकसभेत सांगितले होते. या कराराचा लाभ केवळ एका कर्जबाजारी उद्योगपतीला करून दिला जात आहे असा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता. स्वत: मोदी फ्रांसला जाताना या उद्योगपतीला घेऊन गेले होते. असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काय आहे नेमके प्रकरण
युपीए सरकारच्या काळात या विमानांची किंमत प्रत्यक्ष 525 कोटी रूपये अशी निश्चीत करण्यात आली होती. पण मोदी सरकारने हा करार रद्द करून प्रत्येकी 1670 कोटी रूपये किंमतीने 36 विमाने खरेदी करण्याचा करार फ्रांसशी केला आहे. जे विमान पाचशे कोटीला मिळणार होते त्या विमानाची किंमत सोळाशे कोटी रूपये कशी झाली असा कॉंग्रेसचा सवाल आहे. तर करारातील गुप्ततेच्या कायद्यामुळे विमानांची खरेदी किंमत जाहीर करता येणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. त्यावरून दोन्ही पक्षांत सध्या रणकंदन माजले आहे.