राहुल गांधींच्या रिपोर्ट कार्ड मध्ये मोदींना चार एफ

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला चार वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने त्यांचे उपरोधिक शैलीतील रिपोर्ट कार्ड म्हणजेच प्रगती पुस्तक सादर केले आहे. त्यात मोदींना चार विषयात एफ श्रेणी, एका विषयात बी आणि दोन विषयांमध्ये ए प्लस श्रेणी देण्यात आली आहे.थोडक्यात त्यांनी मोदींना प्रगती पुस्तकात नापास केले आहे.
कृषी, विदेश नीति, इंधनदरवाढ आणि रोजगार निर्मीती या विषयात मोदींना एफ श्रेणी राहुल गांधी यांनी दिली असून योगाच्या प्रसारात त्यांना बी तर घोषणाबाजी, स्वताचीच जाहीरात या विषयात राहुल गांधी यांनी मोदींना ए प्लस श्रेणी दिली आहे. या उपरोधिक शैलीतील ट्विटर संदेशावर अनेकांच्या उलटसुलट प्रतिक्रीया उमटल्या आहेत. मोदींनी कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांची सर्वात अधिक निराशा केली असून दर वर्षी दोन कोटी रोजगार निर्मीती करण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारला युपीएच्या पडत्या काळात जितकी रोजगार निर्मीती होत होती तितकीही रोजगार निर्मीती साधता आली नाही अशी टिका राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षानें त्यांच्यावर सातत्याने केली आहे.
मोदींनी भरमसाठ विदेश दौरे करून भारताची जगातील प्रतिमा उंचावल्याचा दावा सातत्याने केला असला तरी अनेक देशांनी भारताकडे पाठ फिरवली असून भारताला कोंडीतच पकडण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने झाला असल्याचेही कॉंग्रेसकडून सातत्याने सांगितले गेले आहे या पार्श्वभूमीवर सरकार पुर्ण फेल झाले आहे हे दर्शवण्यासाठी राहुल गांधी यांनी या सरकारला चार विषयात एफ श्रेणी दिली आहे. मोदींच्या चार वर्षाच्या राजवटीच्या निमीत्ताने कॉंग्रेसने एक स्वतंत्र पुस्तीका प्रकाशित करून मोदींनी भारतीय नागरीकांची कशी फसवणूक केली आहे याचा तपशील सादर केला आहे. गुलाम नबी आझाद यांनी नुकतीच ही पुस्तिका प्रकाशित केली आहे.