राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची पुण्यात सांगता

- पुण्यात साजरा होणार पक्षाचा वर्धापनदिन
मुंबई – शेतकरी कर्जमाफीसह इतर प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारविरोधात छेडलेल्या हल्लाबोल आंदालनाची सांगता 10 जून रोजी पुण्यात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. याच दिवशी पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने हल्लाबोल आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला विदर्भातून सुरूवात झाली होती. आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. राज्यभर आंदोलन केल्यानंतर शेवटच्या टप्प्यातील पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा पुण्यात संध्याकाळी चार वाजता पर्वती येथील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर होणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय संमेलन 9 आणि 10 जून रोजी पुण्यात होणार होते. परंतु, राज्यभर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने संमेलन पुढे ढकलण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. त्यामुळे हे संमेलन 23 आणि 24 जून रोजी पुण्यातच होईल. सध्या पक्षाच्या आढावा बैठका सुरू असून लवकरच पक्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
भुजबळ उपस्थित राहणार
हल्लाबोल सांगता सभेला पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार, छगन भुजबळ आदी उपस्थित राहतील. भुजबळ यांना मुंबई बाहेर जाण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. परंतु, न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे भुजबळ पुण्यातील सभेला उपस्थित राहतील, असे मलिक म्हणाले.