राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे पद धोक्यात

घराच्या बांधकामात नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण
विक्रोळी येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका मनीषा रहाटे यांच्या नगरसेवकपदावर गुरुवारी निर्णय होणार आहे. विक्रोळी येथील त्यांच्या राहत्या घराची उंची २२ फूट एवढी असून हे बांधकाम पालिकेच्या नियमानुसार नसल्यामुळे त्यांचे पद रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव पालिका प्रशासनाने सभागृहाच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. हा प्रस्ताव गुरुवारी मंजुरीसाठी येणार आहे. प्रस्ताव फेटाळून लावण्याइतके संख्याबळ राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे सभागृहात गुरुवारी सर्व राजकीय पक्ष याबाबत काय निर्णय घेणार, याविषयी पालिका वर्तुळात उत्सुकता आहे.
विक्रोळी येथील प्रभाग क्रमांक ११९ च्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका मनीषा रहाटे यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात राहते घर म्हणून हरियाली व्हिलेज येथील घराचा पत्ता दिला आहे. त्यांच्या घराच्या बांधकामात नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार सुनीता हांडे यांनी मार्च २०१७ मध्ये पालिका आयुक्तांकडे केली होती. त्यांच्या घराची उंची २२ फूट असून ती पालिकेच्या नियमाबाहेर असल्याचे हांडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
बांधकाम करताना त्यांनी पालिकेची परवानगी घेतलेली नाही, त्यामुळे हे बांधकाम पाडून टाकावे अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली होती. हांडे यांनी लघुवाद न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. हांडे यांनी उच्च न्यायालयातही याचिका दाखल करून पालिका आयुक्तांनी आपल्या तक्रार अर्जावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
न्यायालयाने पालिका प्रशासनाला निर्णय घेण्यास कळवले आहे. रहाटे यांचे पद रद्द करण्यासाठी लघुवाद न्यायालयात अर्ज दाखल करण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव आला आहे. या प्रस्तावावर उद्या सभागृहात निर्णय होणार असून राजकीय पक्ष गुपचूप हा प्रस्ताव फेटाळून लावतात की नक्की कोणती राजकीय खेळी खेळतात ते पाहणे उत्सुकतेचे आहे.
शिवसेनेच्या भूमिकेबाबत उत्सुकता
मार्चमध्ये अनधिकृत बांधकामप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांचेही पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. शिवसेनेने संख्याबळाच्या जोरावर तो फेटाळला होता. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मुंबईच्या दौऱ्यावर असताना काँग्रेसचा एकही नगरसेवक सभागृहात नसल्याची संधी साधून शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळला. मात्र राष्ट्रवादीचे केवळ नऊ सदस्य असल्यामुळे पद कसे वाचवणार, पद वाचवण्यासाठी काही राजकीय खेळी खेळणार का, अन्य पक्ष काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.