पिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे निलंबन बेकायदेशीर – योगेश बहल

महापौरांनी सभाशास्त्रांचे नियम पायदळी तुडविले 

पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे निलंबन बेकायदेशीरपणे करण्यात आले आहे. महापौरांना नियम माहित नसून ते नियम पायदळी तुडवत आहेत. गैरवर्तन करणा-या नगरसेवकाला एकाच सभेसाठी निलंबित करण्यात येते. राष्ट्रवादीच्या नगरसवेकांचे निलंबन करून महापौर नितीन काळजे यांनी नियमांची पायमल्ली केली असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केला.

महापालिकेत पत्रकारांशी योगेश बहल बोलत होते.

सर्वसाधारण सभेत झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. मी, मंगला कदम महापौर होतो. आम्ही कधीच नियमांचे उल्लंघन केले नाही. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांचा कसलाही अवमान केला नाही. याबाबत आपण महापौर नितीन काळजे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, नगरसचिव उल्हास जगताप यांना कायदेशीर नोटीस आणि महापालिकेच्या स्थायी समिती, परिवहन समितीच्या कामकाजाचे परिपत्रक त्यांच्याकडे दिले असल्याचेही, बहल यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे निलंबन बेकायदेशीर आहे. एकाही नगरसेवकाने गैरवर्तन केले नाही. महापौर शहराचे प्रथम नागरिक आहेत. आम्ही त्यांचा नेहमीच सन्मान, आदर केला आहे. एखाद्या नगरसेवकाने गैरवर्तन केल्यास त्याला एका सभेसाठी निलंबित करण्यात येते. दुस-या सभेतही त्या नगरसेवकाने गैरवर्तन केल्यास महापौर नगरसेवकाला 15 दिवसांसाठी निलंबित करू शकतात, अशी कायद्यात तरतूद आहे. तरीही कुटील डाव रचत आणि सूडबुद्धीने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे.

महापौरांना सभाशास्त्राचे नियमच माहित नाहीत. आमचे निलंबन चुकीचे आहे. पुढील सर्वसाधारण सभेला आपण सभागृहात जाणार असल्याचे योगेश बहल यांनी ठणकावून सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button