राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी मतदारांना पैसे वाटले?; पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याने लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखविले. त्यामुळे त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला
अण्णा दादू बनसोडे (वय ५०, रा. चिंचवड) यांच्यासह रविंद्र ह्दयनाथ दुबे (वय ४६, रा. कामगारनगर, पिंपरी) यांच्यावर मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखवल्याचा पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शरद निवृत्ती आहेर यांनी तक्रार दाखल केली आहे.
मतदानाच्या दिवशी म्हणजे २९ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे आणि रविंद्र दुबे हे दोघेजण पिंपरी, लिंकरोड परिसरात मतदारांना पैसे वाटप करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लिंकरोड परिसरात जाऊन पाहणी केली असता बनसोडे आणि दुबे हे दोघेजण एका मोटारीत बसल्याचे बघितले. पोलिसांनी ते दोघे बसलेल्या मोटारीची तपासणी केली असता डिकीमध्ये ४८ हजार ५०० रुपये रोख आढळून आले. त्याबाबत बनसोडे आणि दुबे यांच्याकडे पोलिसांनी विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. अखेर त्यांच्यावर मतदारांना पैसे वाटपाचे प्रलोभन दाखवल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.