राष्ट्रवादीचे नगरसेवक ‘नानां’चा ‘का हा अबोला’..!

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी नाना काटे, दत्ता साने या दोघामध्ये रस्सीखेच सुरु होती. याबाबत सर्वस्वी निर्णय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपविला होता. त्यानूसार महापालिकेचे विरोधी पक्षनेते पदी नाना काटे यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. परंतू, कुठे माशी शिंकली, कुणास ठाऊक एेनवेळी त्यांचे नाव बदलून चिखलीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांची विरोधी पक्षनेते पदावर निवड करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व कार्यक्रमात सक्रीय असणारे नगरसेवक नाना काटे हे आता राष्ट्रवादीच्याच कार्यक्रमाला गैरहजर राहू लागले असून ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी एेनवेळी ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची निवड झाली, त्यानंतर महापाैरांच्या हस्ते साने यांना विभागीय आयुक्ताकडून आलेले गटनेते पदाचे पत्र प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी आणि त्यानंतर साने यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसही नाना काटे उपस्थित राहिलेले नाहीत. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील अजित पवारांच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असणारे नाना काटे हे आता राष्ट्रवादीच्या कार्यक्रमापासून फारकत घेवू लागले आहेत.
याबाबत पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॅाग्रेसने घेतलेल्या हल्लाबोल्ल यात्रेचा समारोप आणि वर्धापन दिनाचे कार्यक्रम 10 जूनला पुण्यात घेण्यात येणार आहे. त्यानिमित्त पिंपरी, चिंचवड आणि भोसरी तिन्ही विधानसभा मतदार संघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचा आढावा बैठका घेतल्या. त्यात चिंचवडचा कार्यक्रम वगळता नगरसेवक नाना काटे हे अन्य कोणत्याही कार्यक्रम स्थळी उपस्थित राहिलेले नाहीत. त्यामूळे राष्ट्रवादी काॅग्रेस नेतेमंडळीत आणि कार्यकर्त्यांत नाना काटे यांच्या नाराजीची उघड चर्चा रंगू लागली आहे
दरम्यान, नाना काटे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘देवाक काळजी रे’ या गाण्यातून स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे नाना काटे राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये पु्न्हा सक्रीय होणार की नाही ? यावरुन राजकीय वर्तुळात तर्कविर्तक लढविले जात आहे.