breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राष्ट्रवादीचा राज्यातील दुष्काळ निवारणासाठी आराखडा तयार

मुंबई – राज्यात यंदा भीषण दुष्काळ असून दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून योजनांची अंमलबजावणी करून घेण्यावर लक्ष केद्रींत करण्याच्या सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. जनतेला दुष्काळाचे चटके बसत असताना सरकारच्या दिरंगाईने जनता आणि जनावरेही हैराण झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शनिवारी शरद पवार यांनी पक्षाचे प्रमुख नेते व दुष्काळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याची विशेष बैठक घेतली. या बैठकीत दुष्काळाचा सर्वांगिण आढावा घेत विस्ताराने चर्चा करण्यात आली. दुष्काळाचा सामना करण्यासाठी एक कृती आराखडाच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याचे समजते. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात दुष्काळाने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे दुष्काळी भागात सरकारने तातडीने पिण्याचे पाणी, लोकांना रोजगार, चारा छावण्या व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठीच्या उपायोजना हाती घ्यायला हव्यात, असे आवाहन पवार यांनी केले.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
सरकारने चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्यरित्या करावी यासाठी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफीसारख्या इतरही उपाययोजना तातडीने हाती घेण्याची गरज आहे. सरकारने सुरू केलेल्या चारा छावणीत एका शेतकऱ्याचे केवळ पाच जनावरेच घेतली जातात, ही बाब अनाकलनीय असून सरकारने सर्वच्या सर्व जनावरे चारा छावणीत घ्यावीत अशी मागणीही त्यांनी केली. जनावरांना दरदिवशी ९० रूपयांचे अनुदान अपुरे असून त्यात वाढ करावी.

निवडणूक आयाेग राज यांच्याकडे खर्च का मागते
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाने लाेकसभा निवडणूक न लढवता राज्यात सभा घेतल्याने आयोगाने त्यांना खर्चाचा तपशील देण्याबाबत नोटीस बजावली आहे. यावर शरद पवार म्हणाले,१९७७ मध्ये आणीबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सरकारच्या विरोधात पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत यांच्यासारख्या अराजकीय नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. त्या वेळी निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे खर्च मागितला नव्हता. याचा दाखला देत राज ठाकरे यांच्याकडे सभांचा खर्च मागण्याचा अधिकारच काय, असा सवाल शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button