राम जन्मला गं सखी राम जन्मला , पुण्यात रामनवमी उत्साहात

पुणे – रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम, तसेच जय श्रीराम – जय श्रीराम अशा रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा उत्साहात पार पडला.
श्री रामजी संस्थानच्या वतीने तुळशीबाग येथील राममंदिरात रामजन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.३० पासूनच जन्मसोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी भक्तिमय कीर्तने सादर केली. कीर्तनातून रामनामाचा जप करण्यात आला. तसेच भक्ती, श्रद्धा, परंपरा यांची शिकवण देणारे कीर्तने सादर केली. हिंदू धर्म पाळणारे लोक शिस्त आणि नियमांचे नेहमी पालन करतात. असे त्यांनी नमूद केले.
सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान रामाच्या पोशाखाची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२.४० मिनिटांनी आफळे आणि रामजी संस्थानचे सदस्य यांच्या हस्ते जन्मसोहळा झाला. तुळशीबागेतील राम मंदिर आकर्षक झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते. संपूर्ण मंदिरात लाल, पिवळ्या, केशरी झेंडूच्या माळा लावण्यात आल्या होत्या. मंदिराचा गाभारा रंगबेरंगी पडद्यानी आणि फुलांनी सजवण्यात आला होता. संस्थानच्या सदस्यांनी पुणेरी पगडी, मराठमोळी शेरवानी आणि स्त्रियांनी नववारी साड्या असे पोशाख प्रदान केले होते. राम मंदिर तसेच बाहेरील भाग गदीर्ने तुडुंब झाला होता. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत रामजन्म सोहळ्यात अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. कीर्तनकार आफळे यांच्या बरोबर सर्व रामभक्त भक्तिरसात तल्लीन झाले होते. सोहळ्यात रामाचा धागा भाविकांना देण्यात आला.
…………………
रामजन्म सोहळ्यासाठी पाळणा फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता. जन्माच्या वेळी पाळण्याला बांधलेली दोरी हलवून जन्म सोहळा करण्यात आला. सोहळ्यानंतर सुंठवडा आणि कलिंगडाच्या फोडी असे भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. मंदिराच्या सदस्यांच्या मदतीने आणि पोलिसांच्या सहकायार्ने सोहळा उत्साहात पार पडला.