राणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश

मुंबई: शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्याने महापौरांना राणीबागेमध्ये अतिरिक्त आयुक्तांचा बंगला देण्याचे महापालिकेने ठरवले असले तरी स्वतः महापौर विश्वनाथ महाडेश्वर मात्र राणीबागेत जाण्यास नाखुश आहेत. राणीबाग परिसर सायलेन्स झोनमध्ये येत असून तेथे महापौर निवासस्थान निर्माण केल्यास महापौरांकडे होणाऱ्या गर्दीमुळे प्राणी-पक्ष्यांना त्रास होईल असे प्रशासनाला कळवणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
शिवाजी पार्कमधील महापौर निवासस्थान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा प्रस्ताव पालिका, विधानसभा, विधानपरिषेदत मंजुर करण्यात आला आहे. त्यानंतर प्रशासनाने महापौर निवासस्थानाचे स्थलांतर करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू केल्या आहेत. भायखळा येथील राणीबागेमध्ये पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचा बंगला असून सध्या तो रिक्त आहे. महापौर निवासस्थानी दररोज अनेक व्यक्ती व संस्थांचे पदाधिकारी महापौरांना भेटण्यास येत असल्याने जवळचे ठिकाण असावे या उद्देशाने अतिरिक्त आयुक्तांचा बंगला महापौर निवासस्थान म्हणून देण्याचा विचार प्रशासन करत आहे.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची मात्र राणीबागेमध्ये जाण्याची इच्छा नाही. महापौर बंगल्यात अनेक कार्यक्रम करावे लागतात. तसेच महापौरांकडे येणाऱ्यांच्या वाहनांच्या आवाजामुळे राणीबागेमधील प्राणी व पक्ष्यांना त्रास होऊ शकतो. सायलेन्स झोनमुळे नियमांचा भंग होणार असल्याने प्रशासनाने महापौर निवासस्थानासाठी नवीन जागा शोधावी असे प्रशासनाला कळवणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. मलबार हिल येथील पालिका आयुक्तांचा बंगला महापौरांना देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी महापौरांना तोही पर्याय पसंत नसल्याचे समजते. त्यामुळे महापौर निवासस्थानाचा शोध आणखी काही काळ सुरुच राहणार आहे