राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा : स्नेहल पाटील, युगांध झेंडे विजेते

पुणे – सहावी मानांकित स्नेहल पाटील आणि चतुर्थ मानांकित युगांध झेंडे या ठाण्याच्या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना येथे सुरू असलेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे यूथ मुले व मुलींच्या एकेरीत विजेतेपद पटकावले. सिम्बायोसिस आयोजित ही स्पर्धा सिम्बायोसिस स्पोर्टस सेंटर, प्रभात रोड येथे सुरू आहे. अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या यूथ मुलींच्या अंतिम लढतीत ठाण्याच्या सहाव्या मानांकित स्नेहल पाटीलने सोलापूरच्या बाराव्या मानांकित समृद्धी कुलकर्णीचा प्रखर प्रतिकार 8-11, 11-5, 11-6, 6-11, 11-4, 6-11, 11-9 असा संपुष्टात आणताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. स्नेहलचे या मोसमातील हे पहिलेच राज्य विजेतेपद ठरले. स्नेहलने त्याआधी उपान्त्य लढतीत पुण्याच्या द्वितीय मानांकित ईशा जोशीचा 11-6, 11-6, 11-6, 11-6 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवीत सनसनाटी विजयासह अंतिम फेरी गाठली होती.
तसेच स्नेहलने उपान्त्यपूर्व फेरीतही मुंबई उपनगरच्या तृतीय मानांकित आदिती सिन्हावर 13-11, 11-7, 11-9, 11-2 असा सहज विजय मिळवीत उपान्त्य फेरी गाटली होती. त्याउलट समृद्धी कुलकर्णीला उपान्त्य फेरीत पुण्याच्या पृथिका सेनगुप्ताची झुंज मोडून काढण्यासाठी 14-12, 9-11, 13-11, 11-6, 11-8 अशी लढत द्यावी लागली होती. तर उपान्त्यपूर्व फेरीतही समृद्धीला मुंबई उपनगरच्या अनन्या बसाकला पराभूत करण्यासाठी 11-6, 6-11, 6-11, 11-9, 11-9, 16-18, 11-8 अशी प्रदीर्घ झुंज द्यावी लागली होती.
अनपेक्षितरीत्या एकतर्फी ठरलेल्या यूथ मुलांच्या अंतिम सामन्यात चतुर्थ मानांकित युगांध झेंडेने ठाण्याच्याच तृतीय मानांकित तेजस कांबळेचे आव्हान 11-5, 11-6, 11-5, 11-9 असे सरळ गेममध्ये मोडून काढताना मोसमातील पहिले राज्य विजेतेपद संपादन केले. युगांधने त्याआधी उपान्त्य लढतीत मुंबई उपनगरच्या देव श्रॉफचाही 11-9, 11-9, 11-9, 11-6 असा सरळ गेममध्येच पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.
तसेच उपान्त्यपूर्व फेरीत युगांधने मुंबई उपनगरच्या पाचव्या मानांकित जिग्नेश रहाटवालचा 11-8, 5-11, 11-7, 15-17, 12-10,1 1-5 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला होता. मात्र दुसऱ्या उपान्त्य लढतीत मुंबई शहर संघाच्या मुदित दाणीचा कडवा प्रतिकार मोडून काढण्यासाठी तेजस कांबळेला 13-11, 5-11, 9-11, 11-7, 11-2, 10-12, 11-4 अशी झुंज द्यावी लागली होती. तसेच उपान्त्यपूर्व फेरीतही तेजसला ठाण्याच्या दीपित पाटीलला पराभूत करण्यासाठी 7-11, 21-19, 5-11, 11-8, 11-7, 12-10 असे कौशल्य पणाला लावावे लागले होते.