breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्य मंत्रिमंडळ विस्तार दृष्टिपथात?

मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार दृष्टिपथात असून, येत्या आठवडाभरात महामंडळांच्या नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर लगेचच विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले आणि सातत्याने सरकारवर टीकेचे आसूड ओढणारे एकनाथ खडसे यांनी आता मुख्यमंत्र्यांशी जमवून घ्यायचे ठरवले असून, विस्तार झाल्यास त्यांचा पुनर्प्रवेश होण्याची शक्यता आहे.

गेल्या साडेतीन वर्षांत मंत्रिमंडळातील सदस्य फारसा प्रभाव टाकू शकलेले नाहीत. मुख्यमंत्री आणि आणखी एक-दोन मंत्री सोडल्यास बाकीचे मंत्री काहीही काम करीत नाहीत, अशी प्रतिमा जनमानसात निर्माण झाली आहे. प्रत्येक खात्यात मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागत असून तक्रारीदेखील त्यांच्याकडेच येत आहेत. त्यामुळेच आता मंत्री बदलावे लागतील, अशी भावना मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांकडे  व्यक्‍त केली होती. पक्षश्रेष्ठींनीही त्यासाठी हिरवा कंदील दाखवलेला आहे. मात्र, कुणाकुणाला वगळायचे आणि कुणाला घ्यायचे, याबद्दल निर्णय होऊ शकत नसल्याने विस्तार रखडला होता. आता महामंडळांच्या नियुक्त्यांचा निर्णय झाला असून, काही जणांची वर्णी तेथे लावल्यास विस्ताराचा मार्ग मोकळा होईल, अशी शक्यता आहे.

महामंडळांच्या वाटपाचा तिढा सुटला असून, शिवसेना आणि भाजप यांच्यातले वाटप पूर्ण झाले आहे. त्यानुसार सिडको भाजपकडे आणि म्हाडा सेनेकडे जाईल. भाजपने आमदार प्रशांत ठाकूर यांना सिडकोचे अध्यक्षपद कबूल केले असून, सेनेने म्हाडासाठी अजून नाव नक्‍की केलेले नाही. अन्य महामंडळांच्या नियुक्त्यांवर दोन्ही पक्षांचे नेते काम करीत  असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात आपल्या मंत्र्यांच्या कामाचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. राजे अंबरिश आत्राम, राजकुमार बडोले, विद्या ठाकूर, विष्णू सावरा यांच्यासह आणखी किमान दोन मंत्री मुख्यमंत्र्यांच्या हिटलिस्टवर असून, त्यांच्याजागी विदर्भातले डॉ. संजय कुटे, पश्‍चिम महाराष्ट्रातून खाडे, मुंबईतून आशीष शेलार, नाशिकमधून देवयानी फरांदे या नावांवर विचार सुरू असल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button