महाराष्ट्र

राज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली

शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारचे एक पाऊल पुढे!
मुंबई: उत्तर प्रदेशातील कर्जमाफीनंतर महाराष्ट्र सरकारवरही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोठा दबाव वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील 1 लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली आहे. यासंदर्भात जिल्हा बॅंकांना पत्र लिहिण्यात आले आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या दृष्टीने सरकारने एक पाऊल पुढे टाकले असल्याचे म्हटले जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडे 30 हजार कोटींची थकबाकी आहे. यातील 75% म्हणजे 20 ते 21 हजार कोटींची थकबाकी पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहे. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे केवळ 1 हजार ते 2 हजार कोटींची, तर उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे 15 टक्के थकबाकी आहे. थकलेल्या कर्जाची संकलीत झालेली आकडेवारी पाहिली तर राज्यात कर्जाचाही मोठा असमतोल दिसून आला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातल्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी बऱ्यापैकी समृध्द आहेत. त्यातून आलेल्या सुबत्तेमुळे बॅंकांनी पश्‍चिम महाराष्ट्रात जाळ विस्तारले. इथला शेतकरीही प्रयोगशिल आहे. म्हणून बॅंकाचे कर्जाचे प्रमाणही मोठे झाले आहे.
राज्यातील 31 लाख शेतकरी थकबाकीदार कर्जदार आहेत. 9 मार्च 2017 अखेर राज्यात 30 हजार 216 कोटींचे कर्ज थकले आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे 20 ते 22 हजार कोटी रुपये पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यात आहे. हे प्रमाण एकूण कर्जाच्या 80 टक्के आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, उर्वरित पाच ते सात हजार कोटी उत्तर महाराष्ट्रात नाशिक, खान्देशात जळगाव, मराठवाड्यात लातूरमध्ये आणि विदर्भातील चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यात आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील थकबाकीचे प्रमाण खूपच अत्यल्प म्हणजे एक ते दोन हजार कोटींपर्यंत असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय झाल्यास त्याचा सर्वाधिक लाभ विदर्भ, मराठवाडा वगळता उर्वरित भागाला म्हणजेच पश्‍चिम महाराष्ट्राला होणार आहे. जिथे भाजपाचे बळ अजूनही तुलनेने कमी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button