राज्यात ‘राष्ट्रवादी पक्ष नंबर एक’ होण्यासाठी संघटनात्मक बांधणी आवश्यक – संग्राम कोते-पाटील

पिंपरी – आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर “राष्ट्रवादी’ राज्यात एक नंबर करण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर द्यावा लागणार आहे, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आज राष्ट्रवादी युवक, बुथ आढावा बैठक आणि नवीन पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, प्रवक्ते फजल शेख, उपाध्यक्ष विशाल काळभोर, लाला चिंचवडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
संग्राम कोते पाटील म्हणाले की, बुथनिहाय संघटन वाढवितानां घराणेशाही, जात, पात न बघता जो कार्यकर्ता काम करेल, पक्षाला वेळ देईल अशा कार्यकर्त्यांनाच यापुढे संधी दिली जाईल. सरकारवर काडीचाही भरोसा युवकांना राहिलेला नाही. भूलथापांना भुलल्यामुळेच सर्वसामान्य जनतेला आज बुरे दिन आले असल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदी सरकारला आज चार वर्षे पूर्ण झाली असली तरीही महागाई कमी झाली नसून सरकार महागाई कमी करण्यात अपय़शी ठरली आहे. भाजप सरकार विरोधात लोकांच्या मनात प्रचंड रोष आहे. राज्यभरात युवकांची ताकद उभी राहिली तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून होऊ शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.